विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाला दिली १० दिवसांची मुदत ,तर शिंदे गटाची भूमिका वेळकाढू पणाची ठाकरे गटाचा आरोप
मुंबई : आमदार अपात्र सुनावणीला आज (14 सप्टेंबर) सुरुवात झाली. ठाकरे गटाकडून युक्तिवादाला सुरुवात केली. विधानसभा अध्यक्षांपुढे सुरुवातीला देवदत्त कामत यांच्या माध्यमातून ठाकरे गटाच्या आमदारांची बाजू मांडली गेली.यावेळी ठाकरे गटाकडून कागदपत्रे सादर केली गेली.शिंदे गटाने केलेल्या सुरुवातीच्या युक्तिवादात ते म्हणाले, “आम्हाला याचिकेची कागदपत्रे मिळाली नाहीत कागदपत्रे मिळाली नसल्यानं बाजू मांडण्यास अडचण येत असल्याचं ते म्हणाले.
ठाकरे गटाकडून वकील देवदत्त कामत आणि असीम सरोदे युक्तीवाद करत आहेत. तर शिंदे गटाकडून निहार ठाकरे युक्तिवाद करत आहेत.शिंदेंनी व्हीपचं पालन केलं नाही याबाबतची सुनावणी संपली.
या सुनावणीची अधिक माहिती शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी दिली. ते म्हणाले, “दोघांनी आपली बाजू मांडली. 10 व्या परिशिष्टावर चर्चा झाली. दोन्ही पक्षांना एक मुदत दिली आहे. प्रत्येक आमदार विरुद्ध सुनील प्रभू अशी केस चालणार आहे.”
तर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ म्हणाले, “विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर दोन्ही पक्षांच्या वकिलांनी युक्तिवादाला सुरुवात केली आहे. आमच्या वकिलांनी अपात्रतेवर आक्षेप घेतला. प्रत्येकाची स्वतंत्र सुनावणी आहे. सुनावणी सुरू होईपर्यंत ही किती काळ चालेल. सुनावणी लवकर संपवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण सर्वांचा युक्तिवाद होणं गरजेचं आहे.
ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर म्हणाले, “विधानसभेत कोर्ट आलं होतं आज. 22 याचिकांवर चर्चा झाली. आमचे 16 आणि त्यांच्या याचिका क्लब केल्या आहेत. शिंदे गटाचे वकील साखरे यांनी सांगितलं की आम्हाला वेळ पाहिजे. म्हणजेच वेळकाढूपणा दिसून आलेला आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की गोगावले बेकायदेशीर आहेत. त्याविरोधात अध्यक्षांचं मतदान झालेलं आहे. हे सभागृहात झालेलं आहे. त्याचे पुरावे आहेत. पण ते तपासत नाही. 3 महिन्याहून अधिक काळ लागेल असं दिसत आहे.”
या प्रकरणाचा निकाल केवळ राज्यासाठीच नव्हे तर देशाच्या राजकारणातही महत्त्वाचा ठरणार आहे.शिवसेना कोणाची? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार अपात्र ठरणार की उद्धव ठाकरे गटाचे 14 आमदार अपात्र ठरणार? याबाबतचा निर्णय लवकरच येण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत. यासाठी आजपासून विधानसभेच्या मध्यवर्ती सभागृहात शिवसेनेच्या आमदारांच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे.
विधानसभा अध्यक्षांनी यापूर्वीच शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदारांना आपलं म्हणणं मांडण्याबाबत नोटीस पाठवली होती. त्यानुसार दोन्ही गटांकडून आपला खुलासा आणि काही कागदपत्र अध्यक्षांकडे दिल्याची माहिती मिळते. आता यासाठी आमदार विधानसभेत प्रत्यक्ष हजर राहून आपआपली बाजू मांडणार आहेत. तसंच यावर दोन्ही गटांकडून युक्तिवादही केला जाईल.
विधानसभेतील मध्यवर्ती सभागृहात दुपारी 12 वाजता या सुनावणीला सुरुवात झाली आहे. यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गटातील आमदार आपल्या वकिलांसह उपस्थित राहिले आहेत. यासंदर्भात माहिती देताना ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी म्हणाले, “आम्ही 7 आमदारांचं म्हणणं आमच्या वकिलांमार्फत मांडलं आहे. उर्वरित आमदारही आपलं म्हणणं मांडतील.”
ठाकरे गटाकडून वकील देवदत्त कामत आणि असीम सरोदे युक्तीवाद केला, शिंदे गटातर्फे निहार ठाकरे यांनी युक्तीवाद केला. शिंदे गटाने आपल्याला ठाकरे गटाने केलेल्या याचिकेची कागदपत्रं मिळाली नाहीत अशा युक्तिवाद केला. यावर अध्यक्षांनी दोन्ही गटांनी कागदपत्रं एकमेकांना द्यावीत असं सांगून 2 आठवड्यांची मुदत दिली. पुढील तारीख अध्यक्ष जाहीर करतील.