डाँ.तनपुरे कारखाना निवडणुकीचा बिगुल वाजला

0

१७ मे रोजी मतदान होण्याची शक्यता : राहुरीमध्ये राजकीय हालचालींना वेग

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

             डाँ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याची तीन वर्षांपासून रखडलेली निवडणूक प्रक्रिया मे २०२५ पर्यंत घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले.याचिकेवरील निकालापूर्वी अंतिम सुनावणीत प्रादेशिक सहसंचालक (साखर) अहिल्यानगर यांनी न्यायालयाला अंदाजित निवडणूक कार्यक्रम दिला.त्यानुसार १७ मे रोजी मतदान व १८ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

         डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत जून २०२१ मध्ये संपली होती. त्यावेळी निवडणूक प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते. परंतु शासनाने संचालक मंडळाला एक वर्षे मुदतवाढ दिली.त्यामुळे कारखान्याची निवडणूक घ्यावी यासाठी कारखाना बचाव कृती समितीचे समन्वयक अमृत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे सभासद भरत पेरणे व संजय पोटे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.त्यामुळे सन २०२२ मध्ये संचालक मंडळाची मुदतवाढ संपल्यावर शासनाने संचालक मंडळ बरखास्त करून कारखान्यावर एक वर्षासाठी प्रशासक मंडळाची नियुक्ती केली.

           

निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने कारखान्याला ३२ लाख रुपये भरण्यासाठी कळविले होते. त्यानुसार प्रशासकांनी २० लाख रुपये भरले होते.परंतु शासनाने आणखी एक वर्षासाठी प्रशासकाला मुदतवाढ दिली.त्यावर याचिकाकत्यांचे वकील अँड. अजित काळे व अँड.व्ही. डी. साळुंके यांनी जोरदार आक्षेप घेतला. त्यामुळे न्यायालयाने संचालक मंडळाला व प्रशासकांना दिलेल्या मुदतवाढीवर ताशेरे ओढले. परिणामी, अंतिम सुनावणी दरम्यान जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी न्यायालयासमोर कारखान्याचा अंदाजित निवडणूक कार्यक्रम दिला. त्यानुसार न्यायालयाने मे २०२५ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत निवडणूक घ्यावी, असे आदेश दिले.

         विशेष म्हणजे प्रादेशिक सहसंचालक (साखर) निवडणूक घेण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास आल्याने न्यायालयाने त्यांच्यावर अविश्वास दाखवून जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) अहिल्यानगर यांच्यावर डाँ.तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीची जबाबदारी सोपविली आहे. यामुळे राहुरीत राजकीय हालचालींना वेग आलेला आहे.

न्यायालयासमोर दिलेला निवडणूक कार्यक्रम!

             अंतिम मतदार यादी २८ मार्च, नामनिर्देशनपत्र दाखल करणे ७ ते १५ एप्रिल २०२५ (सकाळी ११ ते दुपारी ३), नामनिर्देशनपत्र छाननी १६ एप्रिल २०२५ (सकाळी ११ वाजता), वैध नामनिर्देशनपत्र सूची प्रसिद्धी १७ एप्रिल २०२५ (सकाळी ११ वाजता) उमेदवाराने नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची ता.१७ एप्रिल ते २ मे २०२५ (सकाळी ११ ते दुपारी ३), अंतिम उमेदवारी यादी प्रसिद्धी व उमेदवारांना निशाणीचे वाटप ५ मे २०२५ (सकाळी ११ वाजता), मतदान १७ मे २०२५ (सकाळी ८ ते सायंकाळी ४), मतमोजणी १८ मे २०२५,निकाल मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तत्काळ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here