डाऊच खुर्द साठवण तलाव एम एस आर डी सी कडून हस्तांतरित व्हावा. 

0

ग्रामपंचायतीच्या वतीने मंत्री दादा भुसे यांना निवेदन 

कोपरगाव (प्रतिनिधी): कोपरगाव तालुक्यातून समृद्धीचे महामार्गाचे काम सुरू असताना डाऊच खुर्द येथील पिण्याच्या पाण्याचा साठवण तलाव या महामार्गात बाधित झाला होता. एम एस आर डी सी कडून बाधित झालेला तलाव दुसरीकडे पुन्हा निर्माण करण्यात आला. साडेतीन एकरावर नव्याने तलावाचे काम पूर्ण झाले असून डाऊच खुर्द गावाला पाणीपुरवठा देखील सुरू आहे. मात्र ग्रामपंचायतीकडे अजून रस्ते विकास महामंडळाने हा पाणीपुरवठ्याचा तलाव हस्तांतरित केलेला नाही. तो लवकरात लवकर हस्तांतरित होण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे व शिवसेना तालुकाप्रमुख संजय गुरसळ यांनी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांना निवेदन दिले आहे.

 

समृद्धी महामार्गात हा तलाव बाधित झाल्यानंतर तत्कालीन सरपंच संजय गुरसळ यांनी माजी खासदार सदाशिवराव लोखंडे, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रालयापर्यंत नव्याने तलाव पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला. गावच्या पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने तातडीने याची दखल घेत दुसरीकडे जागा खरेदी करून तीन ते साडेतीन एकरावर नव्याने पाण्याचा तलाव निर्माण केला. कॉंक्रिटीकरणासह कंपाउंड व इतर सर्व बाबी त्यांनी पूर्ण केल्या.

आज रोजी गावाला याच तळ्यातून पाणीपुरवठा देखील केला जात आहे. मात्र भविष्यात या तळ्यावर अजूनही काही विकासात्मक काम करायचे असेल तर हे तळे ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित व्हायला पाहिजे. यासाठी ग्रामपंचायतीने सर्व कागदपत्रांची पूर्तता करून दिली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी या तळ्यासंदर्भात आढावा घेत लवकरात लवकर साठवण तलाव हा ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केला जाईल असे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here