डाऊच बुद्रुक मध्ये शॉर्टसर्किटने ऊस पेटला शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान..

0

महसूल व वीज वितरण कंपनीकडून पंचनामा 

कोपरगाव (प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील डाऊच बुद्रुक येथील शेतकऱ्यांचा जवळपास 10 एकर ऊस वीज वितरण कंपनीच्या लोमकळत असलेल्या तारांचे घर्षण होऊन पेटला. काही कलायच्या आतच आगीने एवढे रौद्ररूप धारण केले होते की यामध्ये संपूर्ण ऊस जळून खाक झाला. जवळपास दहा ते पंधरा लाख रुपयांचे नुकसान या आगीच्या तांडवामुळे शेतकऱ्यांची झाले.

वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना याबाबत कल्पना दिली. तेव्हा ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासमवेत महसूल विभागाने देखील तलाठी कार्यालय मार्फत सदर जळीत उसाचा पंचनामा केला.

शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई मिळेल का नाही हा नंतरचा प्रश्न आहे मात्र गेल्या काही दिवसापासून वीज वितरण कंपनीच्या गलथन कारभारामुळे सदर घटना घडत असल्याचे चित्र या परिसरात दिसत आहे. मागच्या महिन्यात देखील विशाल रोहमारे, राहुल रोहमारे यांचा तब्बल दहा एकर ऊस पोहेगाव परिसरात पेटला होता. शेतकऱ्यांचे असेच नुकसान होत राहिले तर वर्षापासून संभाळलेल्या पिकापासून शेतकऱ्यांना  एक छदामही मिळणार नाही. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी परिसरातून करण्यात आली आहे. 

काल दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान डाऊच बुद्रुक येथील सर्वे नंबर 137 मधील धर्मा दगडू दहे, अनुसयाताई दगडू दहे, कांताबाई धर्मा दहे, प्रकाश धर्मा दहे व संगीता कर्णा दहे यांचा दहा एकर ऊस शॉर्टसर्किटने शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर जळाला. 

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याला या 265 जातीच्या उसाची नोंद करण्यात आली होती. गळितास आलेला ऊस जळाल्याने लाखो रुपयाचे नुकसान झाले. ऊस जळल्यानंतर शेतकऱ्यांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. कर्मवीर शंकरराव काळे कारखाना व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याच्या दोन अग्निशामक हा ऊस विझवण्यासाठी प्रयत्न करत होत्या. मात्र आगीचा भडका जास्त असल्याने ऊस संपूर्ण जळून खाक झाला. उसाचा पंचनामा देखील झाला आहे मात्र आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार का असा प्रश्न उभा राहिला आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here