मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान होणार.
जामखेड तालुका प्रतिनिधी :
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र महागौरव २०२५ राज्यस्तरीय पुरस्कार जामखेडचे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना झाला आहे. डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी याबाबत सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना या निवडीचे पत्र दिले आहे. या पत्रात म्हटले आहे की , डिजिटल पत्रकारांची भारतातील पहिली संघटना म्हणून नावलौकिक असलेल्या डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पुरस्कार निवड समितीने महाराष्ट्र महागौरव २०२५ राज्यस्तरीय पुरस्कारसाठी निवड केली असल्याचे म्हटले आहे.
मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. जामखेड येथील कोठारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण करीत असलेले काम समाजाला व नव्या पिढीला प्रेरणादायी आहे. अडचणीत सापडलेल्या लोकांच्या मदतीला धावून जाण्याचे कार्य आपण करता. कोरोना काळात आपण बजावलेली भूमिका उल्लेखनीय आहे. आपल्या याच योगदानाची दखल घेऊन आपल्याला उपरोक्त पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
६ एप्रिल २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे होणाऱ्या संघटनेच्या तिसऱ्या महाअधिवेशनात विशेष सोहळ्यात हा पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महाअधिवेशनाचे स्वागताध्यक्ष मंत्री नितेश राणे, माजी शिक्षणमंत्री आ. दीपक केसरकर, आ. निलेश राणे आणि राज्यातील अनेक मंत्री व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार कोठारी यांना बहाल करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना ७५ पुरस्काराने गौरवले आहे