संगमनेर : वसतिगृहात राहणाऱ्या आदिवासी मुलीशी अश्लील हावभाव केल्याने येथील प्रियदर्शनी ग्रामीण व आदिवासी विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ.अरुण इथापे याचेवर शहर पोलिसात पोस्कोसह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला असताना, अद्याप त्याच्यावर कारवाई न झाल्याने रविवारी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून त्याला अटक करण्याची मागणी केली.
सदर घटना २९ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजता शहराजवळील गोल्डन सिटी येथील मुलींच्या वसतिगृहात घडली होती. मुलींच्या वसतिगृहाच्या संस्था चालकानेच केलेल्या या कृत्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त झाला. प्रथमतः पोलिसांनी डॉ. इथापेला पाठीशी घालत गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ केली. त्याला अटक करून गुन्हा दडपण्यासाठी मदत करणाऱ्या कर्मचारी महिलेला सहआरोपी करण्याची मागणी एकलव्य आदिवासी संघटनेने केली होती. मात्र, १ महिना उलटूनही डॉ. इथापेवर कारवाई होत नसल्याने आदिवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. रविवारी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष लकी जाधव, के. ए. ग्रुप अध्यक्ष संदीप गवारी, जिल्हाध्यक्ष रामा पथवे, नाशिकचे जिल्हाध्यक्ष सोनू मेंगाळ, बाळकृष्ण गांगड, विलास आगिवले, पोपट मेंगाळ, सुशीलकुमार चिखले, प्रदीप गोडे, पांडुरंग पथवे, निवृत्ती गिरहे, राहुल तळपे, जालिंदर घिगे, मोहन खाडे, दीपक डगळे, ज्ञानेश्वर भागडे, संदीप पवार, मोहन खाडे व पदाधिकाऱ्यांनी शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून प्रांत कार्यालयावर मोर्चा नेला. डॉ. इथापेचा निषेध व घोषणाबाजी करत तात्काळ अटक करण्याची मागणी केली. शिरस्तेदार श्रीकांत लोमटे यांनी निवेदन स्वीकारले.