डॉ.तनपुरे साखर कारखान्याचे आस्तित्व वाचवण्यासाठी शेतकरी व कामगारांचा उद्या राहुरीत मेळावा!

0

देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे  

             एकेकाळी अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक नंबर असणारा डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे साखर कारखाना आज शेवटचा घटका मोजत आहे. या कारखान्याकडे आज निवडणुक घेण्यासाठी निधी उपलब्ध नाही ही खेदाची बाब आहे. म्हणून यावरील सर्व गोष्टींचा विचार विनीमय करून निवडणुक निधी उभा करून निवडणुक प्रक्रिया राबविण्यासाठी राहुरी कारखाना बचाव कृती समिती च्या वतीने उद्या बुधवारी राहुरी येथे शेतकरी व कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती कृती समिती चे अमृत धुमाळ यांनी दिली आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात धुमाळ यांनी म्हटले आहे की,राहुरी तालुका हा सर्व सोईंनी सुजलाम, सुफलाम तालुका आहे. या तालुक्यामध्ये सहकार चळवळ उभी राहीले पाहिजे म्हणून या तालुक्यातील जुन्या जाणत्या जेष्ठ नेत्यांनी आपल्या जीवाचे रान करून, काबाड कष्ट करून राहुरी तालुक्यात सहकारी संस्थांची उभारणी केली आणि त्या माध्यमातुन तालुक्यात शैक्षणिक, औद्योगिक विकासाची गंगा वाहु लागली. त्यामध्ये राहुरी, देवळाली प्रवरा, तालुक्यातील अनेक खेडेगावातील छोटे-मोठे उद्योगधंदे मोठ्या दिमाखाने उभे राहिले. तालुक्यामध्ये शैक्षणिक संस्था मोठ्या दिमाखाने उभ्या राहिल्या, रस्ते असतील, पाणी प्रश्न असेल, शेतीमालाला योग्य भाव असेल अशा अनेक योजनांचा महापुर सुरु झाला. भावी पिढी शिक्षित झाली. नोकरी व्यवसाय हाताला काम मिळाले. अशातच या राहुरी तालुक्यातील सभासद, शेतकरी व कामगार यांचा हक्काचा मालकीचा असणारा एक काळ सोन्याचा धूर निघणारा कारखाना काही चुकिच्या नेतृत्वाने व नियोजनाने त्याची फिरणारी चाके सोन्याचा धूर निघणाऱ्या चिमण्या अचानक बंद झाल्या व सभासद, शेतकरी, कामगार व छोटे व्यावसायिक देशोधडीला लागले आणि अखेर डॉ.बा.बा.त. सहकारी साखर कारखाना बंद पडला व राहुरी तालुक्याची वाताहात झाली, व्यापारी पेठ उध्वस्त झाली, छोटे-मोठे उद्योग व्यवसाय बंद पडले, नोकऱ्या नाही, शिक्षण नाही, तरुण वर्ग सैरभिर झाला, शेतकरी उध्वस्त झाला, दुसऱ्याच्या हातापाया पडुन आमचा ऊस घेवून जा, तुमच्या पाया पडतो अशी दयनीय अवस्था झाली. ही वेळ आज राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांवर आली. ही बाब खुप दुर्देवी आहे.

     हा कारखाना उभारणीसाठी राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी खुप खस्ता खाऊन, शेअर्स, भांडवल उभे केले. आज ह्याच राहुरी कारखान्याची तेथील असणाऱ्या कामगारांची अवस्था बघवत नाही. आमच्या कामगार भगिनी असतील, कामगार बंधु बांधव असेल आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. चुकीचे नियोजन, चुकीच्या नेतृत्वाकडे गेल्यामुळे प्रचंड भ्रष्ट्राचार, शैक्षणिक संस्थेमध्ये, शिक्षण भरतीमध्ये, प्रवेश भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रचंड लुट केली जाते ही दुर्देवी बाब आहे या गोष्टीचा निषेध करावा तेव्हा कमीच आहे.

  तालुक्यातील सर्व राजकीय, सर्व पक्षिय सामाजिक क्षेत्रातील लोकांना, आवाहन करीत आहे की आपण आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्व पक्षाच्या पदाधिकारी, आजी-माजी आमदार-खासदार, आजी-माजी चेअरमन, संचालक, सरपंच, विविध संघटनेचे पदाधिकारी, व्यापारी वर्ग, छोटे-मोठे उद्योग व्यवसायकार तसेच तालुक्यातील विद्यार्थी तरुण वर्ग या सर्वांनी डॉ.बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखाना वाचविण्यासाठी व तो पून्हा पूर्ववत चालु होण्यासाठी सर्वांनी एकजुटीने पुढे येऊन आपल्या तालुक्याची कामधेनु वाचविण्यासाठी व राहुरी तालुक्याची अस्मिता जिवंत ठेवण्यासाठी पुढाकार घेवुन आपण सर्वांनी मतभेद बाजुला ठेवून एकजुटीने आपला कारखाना व शैक्षणिक संस्था मोठ्या दिमाखाने पुन्हा उभा राहण्यासाठी आपण संघटीत व्हावे ही आपणा सर्व राहुरी तालुक्यातील जनतेला नम्र आवाहन करत आहोत.या पत्रकात अमृत पा. धुमाळ,अरुण पा. कडु,अर्जुन पा. म्हसे, पंढरीनाथ पवार,राजुभाऊ शेटे,सुभाष  करपे,भरत पेरणे,संजय पोटे,दिलीप  इंगळे,रविंद्र मोरे,सुखदेवराव  मुसमाडे,नानासाहेब पठारे,सुधाकर शिंदे, सुधाकर  कराळे,आप्पासाहेब ढूस, बाळासाहेब जठार,नामदेवराव कुसमुडे,अनिल शिरसाठ,अजित कदम,नारायणराव टेकाळे,अरुण डोंगरे यांच्या नावाचा सामावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here