मोफत शिक्षण व आरोग्य सुविधा मिळण्यासाठी काम ;
संगमनेर : डॉ.सुधीर तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघात येणाऱ्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि गावात ठेवलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि त्यातून निर्माण झालेले पारिवारिक नाते हा माझ्यासाठी मोठा अनमोल ठेवा आहे. त्यांचाच आदर्श घेऊन आपण जुन्या पेन्शन सह शिक्षण विभागासह विविध क्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्याने काम करणार असून सर्वांना मोफत शिक्षण व चांगल्या आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदार संघाचे युवा उमेदवार सत्यजीत तांबे यांनी केले.
जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर, चोपडा, यावल ,फैजपूर येथे मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते.या प्रसंगी प्राचार्य डॉ डी. ए. सूर्यवंशी, प्रा. प्रदीप पाटील, ज्ञानेश्वर भादले, आर एच बाविस्कर ,मंगेश भोईटे, अशोक साळुंखे, अजित पाटील , चेतन बाविस्कर आदि सह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना सत्यजित तांबे म्हणाले की, डॉ. सुधीर तांबे यांनी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी मोठे काम केले आहे. त्यांनी बारा वर्षे या मतदार संघातील विविध प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. यामुळे या मतदारसंघाचे आमच्या कुटुंबाशी भावनिक नाते निर्माण झाले आहे. मी बावीस वर्षे समाजकारण आणि राजकारणातून संघर्ष केला असून विविध आंदोलने, मोर्चे यामध्ये माझ्यावर अनेक केसेस दाखल झालेल्या आहेत.आंदोलनातून व चळवळीतून घडलेला मी कार्यकर्ता असून जुनी पेन्शन योजनेबाबत सरकार पुढे चुकीची आकडेवारी सांगितली जात आहे. याबाबत छत्तीसगड व राजस्थान प्रमाणे पॅटर्न राबवून जुन्या पेन्शन योजनेचा लाभ या वंचित १७ लाख कर्मचाऱ्यांना देता येईल यासाठी माझे पहिले काम असणार आहे.याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक अनुदानित व विनाअनुदानित शाळेमध्ये करिअर मार्गदर्शन करता विशेष पॅटर्न राबविण्यात येणार आहे.भारतामध्ये शिक्षण व आरोग्यावर अत्यंत कमी खर्च होतो जीडीपीनुसार शिक्षण क्षेत्रावर सात ते आठ टक्के खर्च होणे अपेक्षित आहे. मात्र सध्या फक्त अडीच टक्के खर्च होत आहे. आणि तोही पगारावर होत आहे. त्यामुळे गुणवत्तेमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात.प्रत्येकाला मोफत शिक्षण व दर्जेदार आरोग्याच्या सुविधा या मिळाल्याच पाहिजे आणि ती शासनाची जबाबदारी आहे यासाठी आपण अधिक काम करणार आहोत.आ.डॉ. तांबे यांनी ५५० किलोमीटरच्या मतदार संघात जोडलेली माणसे हीच आपली मोठी ताकद असून त्यांचाच वारसा सांगत आपण अधिक जोमाने व अधिक चांगले काम करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.यावेळी प्रा. प्रदीप पाटील ,मंगेश भोईटे , आर.एच. बाविस्कर, यांनीही आपले मनोगत व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शैलेश वाघ यांनी केले तर प्रा श्रीमती पिंजारी यांनी आभार मानले. यावेळी पदवीधर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उत्तर महाराष्ट्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व आरोग्य सेवक संघटनेचा पाठिंबा
सत्यजित तांबे यांना आतापर्यंत राज्यभरातील विविध संघटनांनी पाठिंबा दिला असून आज उत्तर महाराष्ट्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी सेवक संघटनेने हि पाठिंबा दिला आहे.