देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
राहुरी फँक्टरी येथील डॉ. तनपुरे कारखाना कामगार वसाहत येथील एका घराला अचानक आग लागल्याची घटना घडली. यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी तत्परता दाखविल्याने काही क्षणात आग आटोक्यात आल्याने मोठी वित्त हानी झाली नसुन सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
हॉलीबॉल ग्राऊंड शेजारी असलेल्या कारखाना कॉलनीतील संजय ईघे यांच्या घरातील स्वयंपाक घराला अचानक आग लागली. यावेळी घरातील मधल्या खोलीत असलेल्या ईघे यांच्या आईला आगेचा लोळ दिसल्याने त्यांनी तातडीने बाहेर पडून मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी झाली. मात्र आग विझवण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. यावेळी प्रसंगावधान राखत जीवाची पर्वा न करता किरण चव्हाण व प्रमोद विधाटे या दोन तरुणांनी स्वयंपाक घरात प्रवेश करून पाणी मारून आग तातडीने विझवली.
यावेळी शांती चौक मित्र मंडळाचे दिपक त्रिभुवन, किशोर कोबरने, सचिन सरोदे, शाम सूर्यवंशी, प्रमोद काळकुंड, सतीश वाघ,प्रणय भोसले, सीताराम नालकर यांच्यासह देवळाली नागरपालिकेच्या अग्निशमन दलाचे सुनील कल्हापुरे व कर्मचाऱ्यांनी मदतकार्य केले. दरम्यान विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत असून परिसरातील तरुणांनी तातडीने मदतकार्य केल्याने पुढील होणारी वित्तहानी टळली आहे.