नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचे अपहरण झाले असल्याची दाट शक्यता-मा. आ. तनपूरे.
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी :
डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. सभासदांच्या अपूर्ण शेअर्स पूर्ण करण्याची प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्याची अंतिम मुदत १२ मार्च असून मोठ्या प्रमाणात सभासद आपले अपूर्ण शेअर्स पूर्ण करण्यासाठी कारखान्याच्या मुख्य कार्यालयात जमा होत असताना प्रशासन व अधिकारी कार्यालयाला कुलुप लावून, फोन बंद करून गेले. या कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचे अपहरण झाले असल्याची दाट शक्यता असून आमची त्या बाबत फिर्याद नोंदवून घ्यावी. अशी आम्हा सभासदांची मागणी आहे. असे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचेकडे केली.
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, हर्ष तनपुरे, कारखाना बचाव कृती समितीचे समन्वयक अमृत धुमाळ, अरुण कडू, राजूभाऊ शेटे, सुखदेव मुसमाडे, प्रकाश भुजाडी, माणिक तारडे, श्रीराम गाडे, नारायण जाधव, दिलीप इंगळे, संजय पोटे, भरत पेरणे अदिंसह अनेक सभासदांनी दि. ११ मार्च २०२५ रोजी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन दिले.
तनपुरे म्हणाले की, निवडणूक प्रक्रियेसाठी कारखान्याच्या तीन-चार कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. अपूर्ण शेअरची रक्कम व थकबाकीची रक्कम भरण्यासाठी सकाळ पासून सभासद आले आहेत. परंतु निवडणूक कर्मचारी व कॅशिअर गायब आहेत. त्यांचे कुणी अपहरण केले काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. निवडणूक प्रक्रियेत बाधा आणण्याचे षडयंत्र असल्याची शंका आहे. यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तहसीलदार नामदेव पाटील, पोलीस उप अधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे, कारखान्याचे प्रशासक तथा जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी, राहुरीचे सहाय्यक निबंधक दीपक पराये यांच्याशी चर्चा केली. कारखान्याच्या केंद्रीय कार्यालयात गैरहजर कर्मचाऱ्यांच्या ठिकाणी एक पोलीस कर्मचारी व राहुरीच्या सहाय्यक निबंधक कार्यालयातील एक कर्मचारी सभासद शेतकऱ्यांबरोबर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करायची. त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल कारखान्याचे प्रशासक व प्रादेशिक सहसंचालक अहिल्यानगर यांना पाठवायचा असे यावेळी ठरले आहे.