संगमनेर : शिबलापुर परिसरात तरसाच्या हल्ल्यात तीन साडेतीन महिन्याच्या नर जातीच्या बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाला. सुरुवातीला बछड्याचा मृत्यू अज्ञात वाहनाच्या धडकेत झाला असावा असा अंदाज वर्तवला जात होता मात्र मृत बछड्याचे शवविच्छेदन केल्यावर बछड्याचा मृत्यू हा वाहनाच्या धडकेत नव्हे तर तरसाच्या हल्ल्यात झाला असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आश्वी, शिबलापूर परिसरातील जनतेच्या काळजीत भर पडली आहे.
शिबलापुर साकुर रस्त्यावर शिबलापूर परिसरातील जिजाबा नागरे यांची शेत जमीन आहे. या जमिनीलगत काल बुधवारी सकाळी बिबट्याचे साडेतीन महिने वयाचे बछडे झोपलेल्या अवस्थेत काही नागरिकांना दिसले, त्यावेळी नागरिकांनी या बछड्याजवळ जाऊन बघितले असता बछड्याच्या तोंडातून रक्त येत होते तसेच ते काहीही हालचाल करत नसल्याने उपस्थित नागरिकांनी संगमनेरच्या वनविभागाला फोन करत माहिती दिली. त्यानंतर भाग तीनचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुभाष सांगळे, वनपाल सुहास उपासनी, वनरक्षक हरिचंद्र जोजर, वनमजूर देविदास चौधरी यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत बछड्याला संगमनेर खुर्द येथील वन विभागाच्या नर्सरीत नेऊन या मृत बछड्याचे शवविच्छेदन केले. यावेळी या बछड्याचा मृत्यू हा वाहनाच्या धडकेत नव्हे तर तरसाच्या हल्ल्यात झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या परिसरात बिबट्यांबरोबरच तरसाचेही आगमन झाल्याने या परिसरातील शेतकरी वर्गात दहशत निर्माण झाली असून वनविभागाची डोकेदुखी मात्र वाढली आहे, कारण बिबट्या पेक्षा तरस हा प्राणी जास्त ताकदवान असल्याने आणि तो हल्ला करण्याची शक्यता असल्याने शेतकरी वर्गाने काळजी घ्यावी असे आवाहन वनविभागाने केले आहे.