१७१ दिव्यांगांना कृत्रिम साहित्याचे वाटप
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघातील दिव्यांग व्यक्तींचे जीवन स्वावलंबी होवून त्यांना आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर करून सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे आयुष्य जगता यावे यासाठी प्रयत्न करीत आहे. यापुढील काळातही दिव्यांगांना सन्मानाने जगण्याची समान संधी मिळावी आणि त्यांच्यातील आत्मविश्वास पुन्हा जागा व्हावा यासाठी दिव्यांगांच्या वेदना दूर करून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर आहे अशी ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरीटेबल ट्रस्ट, कोपरगाव येथे फेलोशिप ऑफ दि फिजिकली हॅन्डीकॅप्ड, मुंबई व आ.आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून कोपरगाव मतदार संघातील दिव्यांग बांधवांना आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते कृत्रिम अवयव व आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते.
आ. आशुतोष काळे पुढे म्हणाले की, दुर्दैवाने किंवा अपघाताने शरीराचा अवयव गमवाव्या लागणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्यासाठी त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी दिव्यांग बांधवांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देण्यापासून ते त्यांना मोफत कृत्रिम अवयव देवून त्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असणाऱ्या कृत्रिम अवयवांचे मोजमाप शिबीर आयोजित करून दिव्यांग बांधवांना व्हील चेअर, कुबडी, वॉकर, तीन चाकी सायकल, कमोड चेअर, वॉकींग स्टीक अशा ज्या काही साहित्याची आवश्यकता असेल जे साहित्य हे दिव्यांग व्यक्ती खरेदी करू शकत नाही त्यांना त्या-त्या साहित्याचे वाटप केले आहे. आजपर्यंत मतदार संघातील जवळपास ३५९ दिव्यांग व्यक्तींना या साहित्याचा लाभ होवून ते स्वत:चे आयुष्य स्वावलंबी होवून जगत आहेत याचा मनस्वी आनंद होत असून मतदार संघातील अजूनही काही दिव्यांग व्यक्ती असतील त्यांचे देखील जीवन सुकर होण्यासाठी यापुढील काळातही शिबिराच्या माध्यमातून सर्व प्रकारची मदत करणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले. यावेळी फेलोशिप ऑफ दि फिजिकली हॅन्डीकॅप्ड, मुंबईचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद-पंचायत सदस्य, माजी नगरसेवक, दिव्यांग बांधव व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार साहेब तुम्ही आमचे आधारस्तंभ———-
आ.आशुतोष काळे यांनी प्रत्येक दिव्यांग व्यक्तींची आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्यावेळी आमदार साहेब तुम्ही आमचे आधार स्तंभ आहात,कोविड काळात देखील आपण आमची अशीच काळजी घेतली हे सांगतांना काही दिव्यांग व्यक्ती भावनाविवश झाले होते. तर एका विद्यार्थिनीने सांगितले की, पाय गमावल्यामुळे जीवनात काहीसे नैराश्य आले होते. परंतु आ.आशुतोष काळेंच्या सहकार्यातून मिळालेल्या कृत्रिम पायावर उभे राहून मी पुढील शिक्षण पूर्ण करणार व आयुष्यात निश्चितपणे यशस्वी होईल याचा मला विश्वास आहे परंतु हा विश्वास मला आ.आशुतोष काळे यांच्यामुळे मिळाला असून त्यांनी माझ्यासाठी एका भावाचे कर्तव्य पार पाडले असल्याचे सांगितले.