नगर – शरीराने जरी दिव्यांग असलो तरी आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे. याची खंत न बाळगता जगण्यासाठी स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करतात. मनात जिद्द व प्रबळ इच्छाशक्ती ठेवून आत्मविश्वासाच्या जोरावर दिव्यांग व्यक्ती disabled सुद्धा यशाची उत्तुंग शिखरे गाठतात हे आपण पाहतो. दिव्यांगांना संधी दिल्यास ते कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत. कामगारांविषयी आम्हाला आपुलकी, प्रेम, सहानुभुती आहे. त्यामुळे एमआयडीसीमधील अनेक कंपन्यांत दिव्यांग कामगार आहेत. भविष्यात दिव्यांग कामगारांना काही मदत लागली तरी आम्ही आमचे कर्तव्य म्हणून ती देऊ, असे प्रतिपादन उद्योजक विजय संकलेचा यांनी केले.
नगर येथील एमआयडीसी मधील उद्योजक ग्रुपतर्फे दिव्यांग कामगार बाळू मारुती भंगाळे, छबू भाऊ अमृते यांचा दिव्यांग दिनानिमित्त आर्थिक सहाय्य व फळे वाटप करुन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी उद्योजक विजय संकलेचा, अनिल लोढा, राजकुमार लुणे, प्रसन्न चंगेडिया, विश्वनाथ पोंदे, प्रमोदकुमार छाजेड आदि उपस्थित होते.
यावेळी उद्योजक राजकुमार लुणे म्हणाले, एमआयडीसी मध्ये असंख्य कामगार रोजंदारीवर काम करतात. एक हात, एक पाय गमावलेले काही कामगार परिस्थितीवर मात करुन कष्ट करतात. शरीराने ते दिव्यांग असले तरी मनाने मात्र सदृढ आहेत हे त्यांच्या कामावरुन दिसते. दिव्यांग दिवस म्हणून आज कामगारांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा सन्मान केला.
सत्काराला उत्तर देतांना बाळू भंगाळे म्हणाले, आज समाजात दिव्यांगांना आदराची, सन्मानाची वागणूक मिळते कधी-कधी वाटते आपण परावलंबी आहोत, पण आम्हाला काम करण्याची संधी मिळाली. दिव्यांग असलो तरी उद्योग क्षेत्रात चांगली माणसे असल्याने आमची जगण्याची उमेद वाढते. सूत्रसंचालन प्रमोदकुमार छाजेड यांनी केले. तर छबू अमृते यांनी उद्योजकांचे आभार मानले.