कोपरगाव : दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे. दिव्यांगांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. दिव्यांग व्यक्तींना समाजाकडून केवळ सहानुभूती नको तर सहकार्य व सन्मान मिळणे गरजेचे आहे. दिव्यांग बांधवांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून त्यांचे मनोबल वाढवले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या मनात दिव्यांगांबद्दलची जागरुकता व आपुलकीची भावना केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता ती कायमस्वरूपी असायला हवी, असे प्रतिपादन माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी केले.
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त स्नेहलताताई कोल्हे यांनी आज रविवारी (३ डिसेंबर) कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे जाऊन अनंत चांगदेव निकम व भाजपचे दिव्यांग मोर्चाचे कोपरगाव तालुकाध्यक्ष मुकुंद मामा काळे यांचा सत्कार करून त्यांना व सर्व दिव्यांग बांधवांना जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर भगवंता परजणे, माजी संचालक फकीरराव बोरनारे, रामभाऊ कासार, संजीवनी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र सखाहरी परजणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, आपण सर्वजण समान आहोत. त्यामुळे कसलाही भेदभाव न करता प्रत्येकाने दिव्यांग बांधवांप्रति आदराची व विश्वासाची भावना बाळगून त्यांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. स्वतःच्या अपंगत्वावर मात करत व स्वतःचे दुःख विसरत पुन्हा नव्याने उभारी घेणारे अनेक दिव्यांग बांधव आहेत. समाजाच्या प्रवाहात मिसळत हे दिव्यांग बांधव सामान्य माणसांपेक्षाही काकणभर जास्त काम करत आहेत. जगात कोणतीही गोष्ट असाध्य नाही हे कृतीतून दाखवून देत ते सर्व दिव्यांगांना प्रेरणा देत आहेत. या दिव्यांगांच्या जिद्दीला सलामच केला पाहिजे. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हेसाहेब, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे व आपण स्वत: आमदार असताना दिव्यांग बांधवांचे विविध प्रश्न सरकारकडे मांडून त्यांना न्याय मिळवून दिला आहे. दिव्यांग बांधवांना अडीअडचणीच्या काळात मदत करण्यासाठी कोल्हे कुटुंबीय व संजीवनी उद्योग समूह नेहमीच अग्रेसर असतो. दिव्यांग बंधू-भगिनींना आरोग्य तपासणी व उपचारासाठी नियमितपणे जिल्हा शासकीय रुग्णालयात जावे लागते. दिव्यांग व्यक्तींची बिकट आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग बंधू-भगिनींना नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात होणाऱ्या दिव्यांग कॅम्पसाठी नेण्या-आणण्याची मोफत व्यवस्था संजीवनी उद्योग समुहाच्या वतीने नियमितपणे केली जाते. यापुढील काळातही दिव्यांग बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी व त्यांच्या मदतीसाठी आपण सदैव तत्पर राहू, अशी ग्वाही स्नेहलताताई कोल्हे यांनी दिली.