दीपावली सणानिमीत्त तात्पुरते फटाके विक्री परवान्याबाबत आवाहन

0

अहमदनगर, दि.११ – विस्फोटक नियम २००८ मधील तरतुदीनुसार सन २०२४ दीपावली सणानिमित्त तात्पुरत्या फटाके परवान्यांसाठी अर्जदारांनी संबंधित तहसील कार्यालयात प्रस्ताव सादर करावे आणि तेथूनच तात्पुरते फटाके विक्री परवाने घेऊन जावे. असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे.

विहीत नमुन्यातील अर्ज तहसील कार्यालयात उपलब्ध राहतील. विस्फोटक नियमांनुसार परवाना शुल्क रुपये ५०० आणि अर्ज छाननी शुल्क रुपये ३०० असे एकूण ८०० रुपये स्टेट बँकेत चलनाने भरून त्याची प्रत मूळ अर्जासोबत जोडावी. स्टॉल ज्या हद्दीत असेल तेथील स्थानिक स्वराज्य संस्थेची शिफारस सोबत जोडावी. नियोजित जागा वाणिज्य प्रयोजनासाठी बिनशेती असलेले असावी, नसल्यास सक्षम अधिकाऱ्यांची वरील प्रयोजनासाठी तात्पुरती बिनशेती परवानगी घेऊन सादर करावी.

फटाका स्टॉलकरिता  उभारण्यात येणारा तंबू  ज्वलनशील पदार्थापासून बनविलेला नसावा आणि तो बंदीस्त असावा. बेकायदेशीर व्यक्तींना प्रवेश करता येणार नाही अशी तंबूची रचना असावी. दोन स्टॉलमध्ये किमान तीन मीटर अंतर असावे, तसेच स्टॉल संरक्षित कार्यस्थळापासून ५० मीटर लांब असावे. स्टॉल समोरासमोर असू नयेत. स्टॉलमध्ये गॅस बत्ती, उघड्या अवस्थेतील दिवे वापरू नये. विद्युत जोडणी लाकडी बोर्डाद्वारे स्टॉलनिहाय असावी. विद्युत जोडणी पक्क्या स्वरुपात असावी.  प्रत्येक रांगेकरीता स्वतंत्र मास्टर स्विच बसविण्यात यावे. 

फटाका स्टॉलपासून कोणालाही ५० मीटरच्या आत फटाके उडविता येणार नाहीत.  एका दुकान समूहामध्ये ५० पेक्षा जास्त दुकाने ठेवू नयेत. शोभेची दारू स्टॉलच्या खिडकीमध्ये प्रदर्शनास ठेवू नये. विक्रीसाठी ठेवण्यात आलेली शोभेची दारू आग प्रतिरोधक पात्रामध्ये ठेवण्यात यावी किंवा मूळ बाह्य आवरणासह विक्रीसाठी ठेवण्यात यावी. ज्वलनशील पदार्थ  रहदारीच्या जागेपासून योग्य अंतरावर ठेवावे.  शोभेची दारू मूळ आवरणातून विक्रीसाठी उघडतांना ती तात्काळ स्वच्छ धुळरहीत जागेत तसेच आग प्रतिरोधक पात्रामध्ये ठेवण्यात यावी.

फटाके साठवण्यासाठी आणि विक्रीसाठी परवाना असलेले दुकान हे ज्वलनशील, विस्फोटक अथवा धोकादायक वस्तू साठवणूकीच्या परिसरापासून किमान पंधरा मीटर अंतरावर असावे. फटाके दुकान निवासी अथवा तळघरात असणार नाही. फटाका विक्री दुकान भरवस्तीत असू नये, उपलब्ध खुल्या जागेत फटाका दुकान असावे. या सर्व बाबींची पूर्तता करून ७ ऑक्टोबरपूर्वी तालुक्याच्या तहसील कार्यालयात परिपूर्ण अर्ज सादर करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here