कोपरगाव(वार्ताहर)
शेतीला पूरक व्यवसाय म्हणून सुरुवातीला पशुपालन करून दूध व्यवसायाला शेतकरी पसंती द्यायचा. मात्र नंतर शेतकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय म्हणून दूध धंदा पुढे आला अनेक तरुणांनी नोकरीला पसंती न देता दूध व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला मात्र आज रोजी हाच दूध धंदा पुन्हा अडचणीत सापडला असून दुधाचे दर पडले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना व दूध उत्पादकांना नफ्या तोट्याचा ताळमेळ लागत नसल्याने ते नाराज झालेले दिसून येत आहे.
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव परिसरात सहकारी दूध उत्पादक संस्थेसह गुजरात पॅटर्न येथील अनेक संस्था या दुगधंद्यात उतरलेल्या आहेत. थेट दूध उत्पादकांच्या घरा जवळ जाऊन त्यांचे दूध आपल्या संस्थेत घेऊन जायची जबाबदारी त्यांनी स्वीकारल्यामुळे चार पैसे कसे मिळतील याकडे लक्ष देत दूध धंद्यामध्ये दूध उत्पादकांनी आघाडी घेतली. मागील महिन्यात दुधाचे दर 38 ते 40 रुपयेवर गेले असताना या महिन्यात दुधाचे दर पुन्हा खाली आले असून दूध संस्थेकडून दूध उत्पादकांच्या दुधाला केवळ 30 ते 32 रुपये दर निघत असल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
एकीकडे दुधाचे दर कमी झाले मात्र दुसरीकडे पशुखाद्यांचे दर वाढलेले आहेत. साधारण एका संकरित गाईला दर दहा दिवसाला साधारण चार हजार रुपयांचे पशुखाद्य लागते व इतर चारा खर्च साधारण चार हजार रुपये करावा लागतो. दहा ते पंधरा लिटर दूध देण्याची क्षमता असलेल्या गाईवर जर आठ हजार रुपये खर्च होत असेल तर शेतकऱ्यांच्या हातात काहीच शिल्लक राहत नाही. राजकीय नेते मंडळी देखील याकडे दुर्लक्ष करत असून जगाचा पोशिंदा म्हणणाऱ्या शेतकऱ्यांवर जर ही अशीच वेळ येत राहिली तर तरुण शेतकरी दूध व्यवसायाकडे वळतील की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. गुजरात येथील सहकारी संस्था दुधाचे दर टिकून ठेवण्यात अग्रेसर असतात मग मात्र महाराष्ट्रातील दूध उत्पादक संस्था शेतकऱ्यांच्या बाबतीत एवढा बारकावा का पाहतात. गुजरात पॅटर्नला शेतकऱ्यांचा दुधाचा दर खरेदीला परवडत असेल तर महाराष्ट्रातील दूध संस्थांना दूध उत्पादकांचे वाटोळे करायचे आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे…