दुष्काळाबाबत माजी आमदारांचे वरातीमागून घोडे – सुधाकर रोहोम

0

प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी केविलवाणी धडपड

कोळपेवाडी वार्ताहर :- संपूर्ण कोपरगाव मतदार संघात पावसाचा खंड पडण्यात एक महिना उलटून गेल्यावर माजी आमदार जाग्या झाल्या आहेत. आ.आशुतोष काळे यांच्या रूपाने कोपरगाव विधानसभा मतदार संघाला सक्षम लोकप्रतिनिधी मिळाला आहे. दुष्काळाची पुसटशी कल्पना येताच त्यांनी केलेल्या पाठपुरावा सुरु केला आहे. मात्र ज्यांना आता जाग आली त्या सिंचनासाठी आवर्तन सुरु असतांना पिकांना पाणी द्या अशी ओरड करताहेत त्या माजी आमदारच झोपेतून उठल्याप्रमाणे काहीतरी बरळत आहे. कुठेतरी प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची त्यांची सुरु असलेली धडपड केविलवाणी असून दुष्काळाबाबत त्यांची हि नौटंकी वरातीमागून घोडे असल्याची खोचक टीका कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे मा. व्हा.चेअरमन सुधाकर रोहोम यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे नाव न घेता केली आहे.

कोपरगाव मतदार संघात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होणार याची पूर्वकल्पना येताच आ. आशुतोष काळे यांनी मागील एक महिन्यापासून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालक मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून सर्वच विभागांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेवून मतदार संघात दुष्काळाची पाहणी करण्यापासून ते शेतकऱ्यांना आगावू पिक विमा नुकसानभरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा केला आहे. मतदार संघात निर्माण होणाऱ्या संभाव्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गावतळे भरून देणे, टँकरची मागणी, जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन याबाबत सबंधित अधिकाऱ्यांना आ. आशुतोष काळे यांनी सूचना दिल्या असून त्याबाबत योग्य कार्यवाही सुरु आहे. मतदार संघातील संभाव्य दुष्काळ परिस्थितीबाबत करावयाच्या उपाय योजनांबाबत मतदार संघाची तातडीने आढावा बैठक घ्यावी अशी मागणी प्रांताधिकारी माणिकराव आहेर यांच्याकडे केली होती. परंतु त्याच दिवशी पालकमंत्र्यांनी संपूर्ण जिल्ह्याची टंचाई आढावा बैठक आयोजित केल्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते. त्यावेळी आ. आशुतोष काळे यांनी पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटलांकडे मतदार संघातील खरीप पिकांचे पावसाअभावी होत असलेल्या नुकसानी बाबत परिस्थिती मांडून खरीप पिकांना तातडीने आवर्तन सोडावे यासाठी आग्रह धरला होता. त्याची दखल घेवून गोदावरी कालव्यांना आवर्तन सोडण्यात आले असून लाभधारक शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवर्तन सुरु आहे.

यावरच न थांबता पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे नियमानुसार शेतकऱ्यांना आगावू २५ टक्के पिक विमा नुकसान भरपाई मिळावी यासाठी कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्याकडे निवेदन देवून मागणी केली आहे. त्याबाबत देखील सातत्याने पाठपुरावा सुरु असून नुकसान भरपाई देण्याबाबतचा आराखडा सुद्धा तयार करण्यात आला आहे. त्याबाबतचा आदेश दोनच दिवसात निघणार आहे. संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहे याला कोपरगाव मतदार संघ देखील अपवाद नाही. त्यामुळे मतदार संघातील शेतकऱ्यांना व नागरिकांना दुष्काळाच्या सोयी सवलतीचा जास्तीत जास्त लाभ कसा मिळवून देता येईल यासाठी आ.आशुतोष काळे प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. ज्या शेतकऱ्यांना २०१९ पूर्वी अडीच किलोमीटर पर्यंतच पाणी मिळत होते काही शेतकऱ्यांना तर ते देखील मिळत नव्हते मात्र २०१९ पासून सर्वच शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत आहे. मात्र राजकीय आकसापोटी आपल्या कार्यकाळात केलेल्या चुकांवर पांघरून घालून प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी त्यांचा सुरु असलेला आटापिटा हा वरातीमागून मागून घोडे असा प्रकार असल्याचे मा. व्हा.चेअरमन सुधाकर रोहोम यांनी म्हटले आहे.

जनतेला २०१९ पूर्वीच्या चुकांची किंमत आज मोजावी लागत आहे.

        चौकट :- २०१४ ला लाटेवर निवडून आलेल्या माजी आमदार पाच वर्ष हवेतच होत्या. गल्लीपासून दिल्ली पर्यंत त्यांच्या पक्षाचे सरकार असतांना देखील त्या पाच वर्षात एकाही सबस्टेशनची निर्मिती करू शकल्या नाही. माजी आमदार अशोकराव काळे यांना श्रेय मिळू नये यासाठी कोळपेवाडी येथे होणारे १३२ के.व्ही.चे सबस्टेशन सिन्नर तालुक्यात शहा येथे पिटाळून लावण्यात माजी आमदारांनी आपली राजकीय ताकद खर्च केली.त्या शेतकऱ्यांना वेळेवर रोहित्र देवू शकल्या नाही, विजेचा एकही प्रश्न माजी आमदार सोडवू शकल्या नाहीत.सिंचनासाठी अडीच किलोमीटर पर्यंतच पाणी देण्याचा निर्णय देखील माजी आमदारांच्या संमतीने झाला. त्याच माजी आमदार प्रशासनावर प्रश्नांचा भडीमार करणे हे हास्यास्पद आहे. याउलट आ.आशुतोष काळेंनी विजेच्या समस्या मार्गी लावतांना पश्चिम भागातील सबस्टेशन शहा १३२ के.व्ही सबस्टेशनला जोडण्या बरोबरच नवीन सबस्टेशन निर्मिती व जुन्या सबस्टेशनची क्षमता वाढविल्या आहेत. त्यामुळे भले आ.आशुतोष काळे यांच्या कामाचे कौतुक करू नका मात्र जनतेत संभ्रम निर्माण करू नका जनतेला २०१९ पूर्वीच्या तुमच्या चुकांची किंमत आज मोजावी लागत आहे.

– मा. व्हा. चेअरमन सुधाकर रोहोम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here