देवळाली प्रवरात अवकाळी पावसाचे थैमान ; पंचनामे होतील परंतु पैसे भेटतील का बळीराजाचा सवाल ?

0

 

देवळाली प्रवरा/ प्रतिनिधी- 

                राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा व परिसरात रात्री अचानक आलेल्या अवकाळी पावसाने थैमान घातले असून शेती पिका चे  प्रचंड नुकसान झाले आहे. मागील काही महिन्यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याचे पंचनामेही  झाले परंतु भरपाईची रक्कम शेतकऱ्याच्या पदरात पडण्या अगोदरच निसर्गाने बळीराजाला पुन्हा एक झटका दिला आहे. येथिल विटभट्टी चालकांनी तयार केलेल्या कच्च्या विटा पावसाने विरघळल्या असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

             दोन दिवसांपूर्वीच मध्यरात्री वांबोरी परिसरामध्ये गारांचा पाऊस झाला होता त्यामध्येही मोठे नुकसान झाले असून काल गुरुवार दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी देवळाली प्रवरासह परीसरात रात्री नऊच्या दरम्यान सुसाट वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतामध्ये असलेली उभी पिके भुई सपाट होऊन होत्याचं नव्हतं झाले.  शेतकरी अरिष्ट संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांची पुन्हा घडी बसविण्यास सुरवात केली असतानाच निसर्गाने पुन्हा एकदा धक्का दिला आहे.  राज्यकर्ते नेहमीप्रमाणे मोठ्या डाम डौलात पंचनामे करण्याचे आदेश देतील परंतु नुस्कान भरपाई किती व केव्हा भेटेल याबाबत मात्र बळीराजाच्या मनात शाशंका निर्माण झाली असून शेतकरी वर्गापुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.

              येथिल विटभट्टी चालक दत्ताञय दळवी, बाबासाहेब दळवी, बंडू दळवी, राजेंद्र  दळवी, यांनी मोठ्या कच्च्या विटा तयार करुन ठेवल्या होत्या अवकाळी पावसाने काही तासात होत्याचे नव्हेते करुन ठेवले. विटभट्टी चालकाचे प्रत्येकी सुमारे चाळीस ते पन्नास हजार कच्च्या विटा पावसात विरघळल्या गेल्या आहेत.मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन विटभट्टी चालक पुन्हा आर्थिक कोंडीत सापडला जाणार आहे.

               शेतकऱ्यांच्या शेतात उभा असलेला कांदा, गहू, हरभरा आदी पिंकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अतिवृष्टीतुन शेतकरी कुठेतरी सावरण्यास लागला असताना पुन्हा निसर्गाने संकट उभे ठाकले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. पुन्हा पंचनामे, नुकसान भरपाईची वर्षानुवर्षे वाट पाहायची.शेतकऱ्यांस खरंच नुकसान भरपाई मिळेल का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here