देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येते. १ एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीत राबविण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत क वर्ग गटातून विभागिय स्तरावरील देवळाली प्रवरा नगपरिषदेस तृतीय क्रमांक मिळाला आहे.बक्षीसापोटी नगरपरिषदेला ५० लाख रुपयांचे बक्षीस मिळणार असल्याचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी सांगितले.
माझी वसुंधरा अभियान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २ ऑक्टोबर २०२० पासून राबविण्यास सुरूवात झाली. माझी वसुंधरा अभियान ४.० स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १ एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२४ दरम्यान राबविण्यात आले. त्यात राज्यातील ४१४ नागरी स्थानिक संस्था व २२ हजार २१८ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला होता.
स्थानिक स्वराज्य संस्थांनी अभियानाच्या कालावधीत कामाचे डेस्कटॉप मूल्यमापन व फिल्ड मूल्यमापन त्रयस्थ यंत्रणामार्फत निवड करण्यात आली. देवळाली प्रवरा नगरपरिषदेस क वर्ग गटातून दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. या उपक्रमातंर्गत मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतून निसर्गाच्या पंचतत्वाचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासाठीच्या उपाय योजना राबवयाच्या आहेत. जाहीर झालेल्या बक्षिसाची ५० टक्के रक्कम निधी अर्थसंकल्पीत झाल्यानंतर तत्काळ संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थाना दिली जाणार आहे तर उर्वरित रक्कम उपाय योजनांचा प्रकल्प अहवाल सादर केलेल्यानंतर दिली जाणार आहे.
देवळाली प्रवरा नगरपरिषदेस मिळालेले बक्षीस मिळण्यात नागरीक, स्वच्छता कामगार, अधिकारी यांचा सिंहाचा वाटा असून सर्वांचे सहकार्य मिळाल्याने हे शक्य झाल्याचे मुख्याधिकारी नवाळे यांनी सांगितले आहे.