देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील लाख रोड परिसरातील मुसमाडे वस्ती येथे एका विहिरीत अनोळखी तरुणाचा मृतदेह आज रविवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान अनोळखी तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
लाख रस्ता मुसमाडे वस्ती येथे सुभाष मुथ्था यांच्या शेतात स्वमालकीची विहीर आहे. दुपारच्यावेळी जवळ राहणारे यशावंत पोटघन यांना सदर विहिरीत पिवळा टी शर्ट व काळ्या रंगांची पॅन्ट घातलेल्या अवस्थेत अनोळखी तरुणाचा मृतदेह दिसून आला. त्यानंतर त्यांनी सदर माहिती माजी नगरसेवक डॉ.संदीप मुसमाडे यांना दिली.घटनास्थळी राहुरी पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार विष्णु आहेर यांनी धाव घेऊन पंचनामा केला. या ठिकाणी विहिरीत तरंगलेल्या अवस्थेत मृतदेह पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान मृतदेह वर काढण्यासाठी देवळाली प्रवरा नगरपालिकेचे कर्मचारी भारत साळुंके, सोमनाथ सूर्यवंशी, सुनील खाटीक, सखाहरी सरोदे, रमेश म्हसे, प्रसन्न पंडित, महेश पवार, दिलीप बर्डे तसेच राजेंद्र कदम, बाबजी काळे, नवनाथ काळे, शरद काळे, संदीप मोरे, बाळू मोरे, दत्तू मोरे,राजेंद्र पंडित, दीपक पाडळे, संभाजी कडू दिनकर कडू ,रंगनाथ मुसमाडे, संजय पंडित तसेच छत्रपती प्रतिष्ठान, साई प्रतिष्ठानच्या सदस्यांनी व मुसमाडे वस्ती येथील नागरिकांनी परिश्रम घेतले.सदर मृतदेह रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे व पप्पू कांबळे यांच्या मदतीने राहुरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत.