देवळाली प्रवरा विकास कामांसाठी ७३.३१ कोटी मंजूर….

0

सत्यजित कदम यांच्या प्रयत्नांना यश…

देवळाली प्रवरा/ प्रतिनिधी 

            देवळाली प्रवरा नगरपरिषदेची पाणीपुरवठा योजना गेल्या २५ वर्षापासून कार्यान्वित आहे, गेल्या काही दिवसापासून त्या योजनेची मुख्य जलवाहिनी दोन वेळा फुटल्याने व मुळा धरण ते राहुरी फॅक्टरी जलशुद्धीकरण केंद्र ही मुख्य जलवाहिनी जीर्ण झाल्यामुळे मा.लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी नगरपरिषदेच्या माध्यमातून ही मुख्य जलवाहिनी नव्याने टाकण्यासाठी व इतर विकास कामासाठी मंत्रालयात प्रस्ताव दाखल केले होते, या प्रस्तावांस काल दि. ११ ऑक्टोबर २०२४ रोजी शासनाने मंजुरी देवून देवळाली प्रवरा शहरास पाणी योजनेच्या सुधारणेसाठी रु. ६८.३१ कोटींचा निधी मंजूर केला आहे. 

 

माजी. आ. चंद्रशेखर कदम पाटील यांनी आपल्या कार्यकाळात १९९८-१९९९ मध्ये पहिल्यांदा राहुरी तालुक्यातील इतर पाणी योजनांबरोबर देवळाली प्रवरा शहरासाठी १७.६० कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली होती, त्यामुळे खऱ्या अर्थाने शहरातील महिलांच्या डोक्यावरचा हंडा खाली उतरविला, त्यानंतर २०१७-२०१८ मध्ये सत्यजित कदम हे लोकनियुक्त नगराध्यक्ष असतांना त्यांनी शहरातील उंच भागातील पाणीपुरवठ्या पासून वंचित असणाऱ्या नागरिकांसाठी १५.२५ कोटींची वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली व पूर्णत्वास नेली. 

मा.आमदार चंद्रशेखर कदम पाटील यांच्या काळात पहिल्या पाणीपुरवठा योजनेची मुख्य जलवाहिनी २५ वर्ष झाल्याने ती जीर्ण होत चालली आहे, मध्यंतरीच्या काळात ही मुख्य जलवाहिनी दोन तीन वेळा फुटल्याने मा. लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी नगरपरिषदेमार्फत मुख्य जलवाहिनीचा सर्वे करून प्रस्ताव मंत्री मंडळाच्या मंजुरीसाठी मंत्रालयामध्ये दाखल केला व त्याशिवाय देवळाली प्रवरा शहरातील श्रीरामपूर रस्ता ते एस.टी. स्टँड २० मीटर रुंदीचा रस्ता कॉक्रीटीकरण करणे व देवळाली प्रवरा शहरातील स्मशानभूमी व दशक्रियाविधी स्थळ नूतनीकरण व सुशोभीकरण करणे याची मागणी केली होती. या सर्व मागण्यास मा.लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला, त्या प्रस्तावास काल दि. ११ ऑक्टोबर २०२४ रोजी कॅबिनेट मंत्रीमंडळाने नगरोत्थान महाभियानांतर्गत नगरविकास मंत्रालयाने ६८.३१ कोटींची मंजुरी दिली आहे आणि श्रीरामपूर रस्ता ते एस.टी. स्टँड २० मीटर रुंदीचा रस्ता कॉक्रीटीकरण करणे यासाठी ३ कोटी व देवळाली प्रवरा शहरातील स्मशानभूमी व दशक्रियाविधी स्थळ नूतनीकरण व सुशोभीकरण करणे यासाठी २ कोटी असे एकूण ७३.३१ कोटी देवळाली प्रवरा शहरासाठी सत्यजित कदम यांच्या प्रयत्नातून शासनाच्या माध्यमातून मंजूर करून आणले आहेत.मा.लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व अजितदादा पवार साहेब यांचे देवळाली प्रवरा शहरवासीयांच्या वतीने आभार मानले आहेत व या कामांमुळे देवळाली प्रवरा शहराच्या पाणी योजनेत सुधारणा होऊन नवीन काही औद्योगिकीकरण होण्यास मदत होईल तसेच इतर कामांमुळे शहराच्या वैभवात भर पडेल.

 

गेल्या तीन वर्षांपासून नगरपरिषदेच्या निवडणुका झालेल्या नाहीत नगराध्यक्षा ऐवजी प्रशासक नगरपरिषदेचे कामकाज पाहतात तरी देखील नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी ७३.३१ कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे. शहराच्या विकासाची गंगा कायम सुरु ठेवली आहे.  प्रकाश संसारे- माजी उपनगराध्यक्ष देवळाली प्रवरा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here