संगमनेर : संगमनेर तालुक्यातील निमोण ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच संदीप देशमुख यांच्या बंगल्यावर चोरट्यांनी डल्ला मारत तब्बल १४ लाख रुपयाची केबल चोरून नेली. यावेळी ग्रामस्थांच्या प्रसंगावधान व समय सुचकतेमुळे एक चोरटा ग्रामस्थांच्या हाती लागला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी सरपंच संदीप भास्कर देशमुख यांनी तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की सोमवारी मध्यरात्री सफेद रंगाच्या स्कॉर्पिओ गाडी मधून (क्रमांक ८०५५ पूर्ण क्रमांक नाही) आलेल्या आरोपींनी घरासमोर ठेवलेल्या १४ लाख १७ हजार ४१६ रुपये किमतीचा काळ्या रंगाचा बंडल चोरून नेला. याप्रकरणी अक्षय संजय जाधव रा. बालमटाकळी, तालुका शेवगाव याच्या सह त्याच्या आणखी दोघासाथीदारा विरोधात तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अक्षय जाधव याला ग्रामस्थांच्या मदतीने पकडण्यात आले. त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून घटनेची माहिती मिळाल्यावर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक विजय खंडीझोड आणि त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विजय खंडीझोड करत आहेत.