संगमनेर : नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारी अर्जाचा गोंधळ शेवटपर्यंत पाहिला मिळाला. काँग्रेसने अधिकृत उमेदवारी जाहीर केलेल्या डॉ. सुधीर तांबे यांनी ऐनवेळी माघार घेतली आणि त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला.
महाविकास आघाडीमध्ये झालेल्या चर्चेनुसार नाशिक पदवीधर विधान परिषदेची जागा ही काँग्रेसला देण्यात आली होती. काँग्रेसने या निवडणुकीत डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली. डॉ. सुधीर तांबे हे नाशिक पदवीधर मतदारसंघातून तीन वेळेस विजयी झाले होते. काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांच्यासाठी एबी फॉर्म दिला होता, पण त्यांनी अर्जच भरला नाही.
“आम्ही काँग्रेस पक्षाकडे मागणी केली होती, की विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळावी. काँग्रेस पक्ष श्रेष्ठींची आणि काँग्रेसमधल्याच अनेक लोकांची मला उमेदवारी देण्याची इच्छा होती.
काँग्रेस पक्षाने मात्र डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काही तांत्रिक अडचणींमुळे मला शेवटच्या क्षणी अपक्ष म्हणून अर्ज भरला,” असं सत्यजित तांबे यांनी म्हटलं.
या सगळ्या नाट्यानंतर सत्यजित तांबे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
“मी दोन अर्ज भरले. एक काँग्रेसकडून आणि एक अपक्ष म्हणून. परंतु माझ्या नावाचा एबी फॉर्म वेळेवर येऊ न शकल्यामुळे मला अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवावी लागेल. परंतु मी उमेदवार काँग्रेस पक्षाचा आहे. काँग्रेसच्या विचारांवर मी काम केलं आहे.”
अपक्ष म्हणून अर्ज भरल्यानंतर आपण भाजप, शिवसेनेचे दोन्ही गट तसंच राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्याची विनंती करणार असल्याचं सत्यजित तांबेंनी म्हटलं.
“राजकीय विचारसरणी आणि राजकीय पक्षाच्या सीमांच्या पलिकडे जाऊन या निवडणुकीत सर्वांनी माझ्या पाठिशी राहावं ही माझी सर्वांना विनंती आहे. माझी उमेदवारी ही काँग्रेस पक्षाचा कार्य़कर्ता म्हणून आहे आणि सर्वच राजकीय पक्षांनी मला मदत करावी अशी विनंती मी त्यांना करेन.”
‘तरुण नेतृत्वाला संधी द्यावी’
डॉ. सुधीर तांबे यांनी या सगळ्या गोंधळानंतर माध्यमांशी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, एका तरुण नेतृत्वाला संधी द्यावी असं माझं या मतदारसंघातील मतदारांना आवाहन आहे.
सत्यजित तांबे यांनी प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम केलं आहे. त्यांनी शहरीकरणाच्या मुद्द्यावरही पुस्तक लिहिलं आहे. त्यांना सामाजिक राजकीय प्रश्नांची, उद्योग वगैरे क्षेत्रांची जाण आहे, असंही डॉ. सुधीर तांबे यांनी म्हटलं.
दरम्यान, या सगळ्या गोंधळानंतर काँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर करूनही अर्ज न भरल्यानं डॉ. सुधीर तांबेंवर शिस्तभंगाची कारवाई होणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
एबी फॉर्म भरल्यानंतर एखादा उमेदवार हा पक्षाचा अधिकृत उमेदवार असतो. डॉ. सुधीर तांबेंना काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या सही-शिक्क्यानुसार उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळेच आता डॉ. सुधीर तांबे आणि सत्यजित तांबेंच्या उमेदवारीबद्दल पक्षाची काय भूमिका असेल याकडे सर्वांचं लक्ष आहे.