संगमनेर : तालुक्यातील आश्वी खुर्द येथे काही वर्षापूर्वी बांधण्यात आलेले व्यापारी गाळे हे सुरेश मांढरे यांनी आपल्या हद्दीत बांधल्याचा खळबळजनक आरोप करत हे गाळे काढून घेण्यासाठी उपोषणाचे हत्यार उपसले होते. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी उपोषणाची माहिती मिळाल्यानतंर महसूलमंत्री ना. विखे पाटील यांचे स्वियं सहाय्यक डॉ. संजय कहार यांनी स्थानिक पुढाऱ्याच्या मदतीने सुरेश मांढरे यांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिल्यानतंर हे उपोषण मागे घेण्यात आले.
बुधवारी सुरेश मांढरे हे आश्वी खुर्द ग्रामपंचायतीसमोर उपोषणाला बसले होते. सीटी सर्व्हे नंबर १८६ त्यामध्ये ग्रामपंचायत नंबर ३५९ व ३६० मध्ये ग्रामपंचायत आश्वी खुर्द यांनी बेकायदेशीरपणे व्यापारी गाळे बांधले आहे. याबाबत मी ग्रामपंचायतीला वारंवार कल्पना दिली व त्या जागेची मोजणी केली. परंतू माझ्या जागेतील बेकायदेशीर बांधकाम ग्रामपंचायतीने काढले नाही किंवा त्याचा मोबदलाही मला दिलेला नाही. त्यामुळे बुधवार दि. २१ डिसेंबर पासून बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती उपोषणकर्ते सुरेश मांढरे यांनी दिली होती. गुरुवारी सुरेश मांढरे हे उपोषणाला बसल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाला मिळाली होती. त्यामुळे तात्काळ ना. विखे पाटील यांचे स्वियं सहाय्यक डॉ. संजय कहार यांनी उपोषणस्थळी येऊन सुरेश मांढरे यांची बाजू ऐकून घेतली. यानतंर त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडून याबाबत सविस्तर माहिती घेऊन भूमि अभिलेख अहमदनगर यांच्या कार्यालयाकडून अहवाल आल्यानतंर ना. विखे पाटील यांच्याशी चर्चा करुन योग्य तो न्याय देण्याची ग्वाही उपोषणकर्ते सुरेश मांढरे यांना दिली. त्यामुळे सुरेश मांढरे यांनी दोन दिवसापासून सुरु असलेले आपले उपोषण स्थगित केले. यावेळी प्रवरा कारखान्याचे संचालक डॉ. दिनकर गायकवाड, माजी जिल्हा परिषद संदस्या सौ. कांचनताई मांढरे, सरपंच म्हाळू गायकवाड, ग्रामसेवक प्रविण इल्हे, माजी उपसरपंच संजय गायकवाड, निलेश भवर, कैलास गायकवाड, विजय भोसले, डॉ. लक्ष्मण भोसले, संतोष भडकवाड, मोहित गायकवाड, दिपक सोनवणे, मयुरेश शिंदे आदी उपस्थित होते.