संगमनेर : संगमनेर तालुक्यातील निमगाव बुद्रुक सह मिर्झापूर, निमगाव खुर्द, पेमगिरी, सावरचोळ, धुपे, नांदुरी दुमाला या सात गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरलेली योजना सहा महिन्यापासून बंद आहे. ती तात्काळ सुरू करावी अशी मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष सतीशराव कानवडे यांनी केली आहे. याबाबत सतीश कानवडे यांनी सांगितले की, गेल्या सहा महिन्यापासून या सात गावांना वरदान ठरलेली ही योजना बंद असल्याने या सात गावातील माता-भगिनींना दूरवरून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. या सात गावातील ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्यांनी योजनेच्या अध्यक्षाकडे वारंवार या योजनेचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी गळ घातली. मात्र योजनेच्या अध्यक्षांनी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप सतीशराव कानवडे यांनी केला आहे. सदर योजनेत येणाऱ्या ग्रामपंचायतींनी या योजनेचा देखभाल दुरुस्ती खर्च वेळोवेळी दिला आहे. असे असतानाही या गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप सबंधित योजनेच्या अध्यक्षांकडून सुरू असल्याचा आरोपही कानवडे यांनी केला आहे. या योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या सात गावातील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य या सर्वांची एकत्रित बैठक घेऊन या योजने संदर्भात बैठक घेऊन हा पाणीपुरवठा त्वरित सुरू करावा अशी मागणी ही सतीशराव कानवडे यांनी संबंधित विभागाकडे केली असून यावर तात्काळ निर्णय झाला नाही तर या सात गावातील ग्रामस्थांना घेऊन ठिय्या आंदोलन केले जाईल असा इशारा देखील सतीशराव कानवडे यांनी दिला आहे.