निळवंडे पोट चाऱ्यांची कामे पूर्ण होईपर्यंत बंधारे भरून द्यावे : आ. आशुतोष काळे

0

कोळपेवाडी वार्ताहर :- मागील आठवड्यात निळवंडे कालव्यांची चाचणी सुरू करण्यात आली असून जवळपास ८५ किलोमीटर पर्यंत झालेली यशस्वी चाचणी निळवंडे कालव्यांच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मात्र कोपरगाव तालुक्यातील अनेक गावातील निळवंडे कालव्यांच्या पोटचाऱ्यांची कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे पोटचाऱ्यांची कामे पूर्ण होईपर्यंत एस्केपद्वारे किंवा अन्य माध्यमातून मतदार संघातील बंधारे भरून देण्यासाठी नियोजन करा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी निळवंडे कालव्यांच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

आ. आशुतोष काळे यांनी कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर निळवंडे कालव्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत कोपरगाव मतदार संघातील गावांना निळवंडे कालव्यांचा होणाऱ्या लाभाबाबत निळवंडे कालव्यांच्या कामाची आढावा बैठक घेतली. या बैठकीसाठी कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे, डेप्युटी इंजिनिअर विवेक लव्हाट, निळवंडे कालवाकृती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे, कार्याध्यक्ष गंगाधर गमे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रवीण शिंदे, शंकरराव चव्हाण, गंगाधर औताडे, पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार पतसंस्थेचे संचालक बाबुराव थोरात, किसनराव पाडेकर, प्रभाकर गुंजाळ, युवराज गांगवे, आप्पासाहेब गुंजाळ, रवींद्र वर्पे, कौसर सय्यद, चंद्रकांत पाडेकर, मंगेश खंडीझोड, दत्तात्रय म्हाळसाकर, सतीश म्हाळसाकर, गजानन मते, संतोष वर्पे, गोपीनाथ राहणे, ज्ञानेश्वर गव्हाणे, अशोक गव्हाणे, रंगनाथ गव्हाणे, शिवाजी राहणे आदी उपस्थित होते.  

या बैठकीत निळवंडे कालव्यांच्या कामाचा आढावा आ. आशुतोष काळे यांनी घेवून अधिकाऱ्यांना बंधारे भरण्याचे नियोजन करण्यास सांगितले.त्याचबरोबर मतदार संघातील सर्व पोट चाऱ्यांचा सर्व्हे पूर्ण झालेला आहे. त्यामुळे झालेल्या सर्व्हेप्रमाणे सर्व चाऱ्यांची डिझाईनची कामे तातडीने पूर्ण करून लवकरात लवकर चाऱ्यांच्या कामाच्या निविदा प्रसिद्ध करून कामांना सुरुवात करावी. तोपर्यंत लाभक्षेत्रातील कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख, बहादरपुर, अंजनापूर, काकडी, मनेवाडी, वेस सोयगाव, शहापूर, मल्हारवाडी, जवळके, धोंडेवाडी, डांगेवाडी मतदार संघातील राहाता तालुक्यातील वाकडी, चितळी व धनगरवाडी या गावातील ओढे व बंधारे भरून देण्यासाठी नियोजन करावे जेणेकरून त्याचा फायदा काही प्रमाणात शेतकऱ्यांना होईल. त्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने शासकीय दरबारी मी पाठपुरावा करीन अशी ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here