निवडणुकीवरून घुलेवाडीत थोरात समर्थकात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी 

0

तर विचार करावा लागेल सिताराम राऊत यांचा थेट नेतृत्वालाच गर्भित इशारा, गद्दार कोण आत्मचिंतन करा – निर्मला गुंजाळ,शितल पानसरे 

संगमनेर : चंद्रकांत शिंदे पाटील

रविवारी पार पडलेल्या घुलेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीनंतर मंगळवारी लागलेल्या निकालाने घुलेवाडीतील थोरात समर्थक पुढारी एकमेकावर चिखल फेक करू लागले आहेत. गद्दारांना कार्यक्रमात यापुढे स्टेजवर प्रवेश दिला व त्यांना जवळ केले तर विचार करावा लागेल असा गर्भित इशारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सीताराम राऊत यांनी थेट नेतृत्वालाच दिला. तर गद्दार कोण ? याचे आत्मचिंतन सिताराम राऊत यांनी करावे आणि स्वतःची लायकी तपासावी असा सल्ला जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या तथा घुलेवाडीच्या माजी सरपंच निर्मला गुंजाळ आणि शेतकरी परिवर्तन पॅनलच्या सरपंच पदाच्या पराभूत उमेदवार शितल पानसरे यांनी दिला. त्याचबरोबर आमदार बाळासाहेब थोरात आमच्या हृदयात व देव्हाऱ्यात आहेत, आम्हाला कोणीही निष्ठा शिकवू नये असे म्हटले. त्यामुळे गत दोन दिवसापासून घुलेवाडीत सुरू झालेले हे महाभारत थांबायचे नाव घेत नाही. त्यामुळे आरोप प्रत्यारोपाच्या या संसर्गावर माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनाच वेळीच इलाज करावा लागणार आहे. अन्यथा घुलेवाडीत सुरू झालेला आरोप प्रत्यारोपाचा संसर्ग तालुक्यात पसरण्यास वेळ लागणार नाही.

           १८ डिसेंबरला तालुक्यातील ३७ गावातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. याचा निकाल मंगळवार दिनांक २० डिसेंबरला लागला, या निकालात तब्बल आकरा गावात आ.थोरात समर्थक पुढाऱ्यांच्या एकमेकांच्या जिरवा जिरवीत संपूर्ण गावाच्या मतदानातून विरोधी पार्टीचे सरपंच निवडून आले आहेत. त्यामुळे या अपयशाचे नेतृत्वाला उत्तर द्यावे लागेल म्हणून स्थानिक पातळीवरचे आ.थोरात समर्थक पुढारी अपयशाचे खापर एकमेकावर फोडू लागले आहेत. जिल्ह्यात सर्वात मोठ्या असणाऱ्या संगमनेर शहरा जवळील घुलेवाडीत सिताराम राऊत यांच्या शेतकरी विकास मंडळ आणि घुलेवाडीचे माजी सरपंच स्व.अजित पानसरे यांच्या पत्नी शितल पानसरे यांच्या शेतकरी परिवर्तन मंडळ या दोन आमदार थोरात समर्थक पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदंवाराचा घुलेवाडीचे प्रथम लोकनियुक्त माजी सरपंच सोपानराव रामचंद्र राऊत आणि बाळासाहेब रामचंद्र राऊत या दोन बंधूंच्या ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवार त्यांच्या सुनबाई निर्मला कैलास राऊत यांनी मोठ्या फरकाने धुव्वा उडवत सिताराम राऊत यांच्या गटाच्या ताब्यात असणारी घुलेवाडी ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात घेतली आहे. सिताराम राऊत यांच्या गटाचे १५ आणि शितल पानसरे गटाचे दोन सदस्य या निवडणुकीत विजयी झाले असले तरी संपूर्ण गावाने वरील दोन्ही गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवारांना सपशेल नाकारून सोपानराव राऊत आणि बाळासाहेब राऊत या दोन बंधूंच्या ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या निर्मला कैलास राऊत यांना मोठ्या फरकाने विजयी केले. निर्मला राऊत यांच्या विजयाने आमदार थोरात गटाच्या सिताराम राऊत आणि स्व.अजित पानसरे यांच्या पत्नी शितल पानसरे, घुलेवाडीच्या माजी सरपंच तथा माजी जिल्हा परिषद सदस्या निर्मला गुंजाळ यांच्यात आता वार, प्रतिवार झडू लागले आहेत. सिताराम राऊत यांनी नूतन सरपंच निर्मला कैलास राऊत यांच्या विजयाला शेतकरी परिवर्तन पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवार शितल पानसरे या कारणीभूत ठरल्याचे सांगुन त्यांच्यामुळेच शेतकरी विकास मंडळाचा सरपंच पदाचा उमेदवार पराभूत झाल्याचा आरोप केला. एवढ्यावरच सिताराम राऊत थांबले नाहीत तर त्यांनी शितल पानसरे आणि शितल पानसरे यांना मदत करणाऱ्या माजी जिल्हा परिषद सदस्य निर्मला गुंजाळ यांना गद्दार म्हटले, तसेच माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी या गद्दारांना कोणत्याही कार्यक्रमात स्टेजवर बसून देऊ नये व त्यांना जवळ करू नये असे सांगितले, जर नेतृत्वाने त्यांना जवळ केले तर आम्हाला विचार करावा लागेल असा गर्भित इशारा द्यायला देखील ते विसरले नाहीत. सिताराम राऊत यांच्या या इशाऱ्यानंतर शितल पानसरे आणि निर्मला गुंजाळ यांनी सिताराम राऊत यांना खडे बोल सुनावत गद्दार कोण आहे याचे आत्मचिंतन करा, असे सांगितले. तुमची लायकी काय आहे हे संपूर्ण तालुक्याला माहित आहे. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात आमच्या हृदयात आणि देव्हाऱ्यात आहेत, त्यामुळे तुम्ही निष्ठा शिकवू नका असा पलटवार केला. त्यामुळे घुलेवाडीत निवडणुकीनंतर थोरात समर्थक पुढाऱ्यात आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. त्यामुळे आरोप प्रत्यारोपाचा हा संसर्ग तालुक्यातील इतर गावात पसरू नये यासाठी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी या संसर्गावर इलाज करण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान नेतृत्वालाच खुलेआम माध्यमांसमोर आव्हान देणाऱ्या सिताराम राऊत यांच्यावर माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात काय कारवाई करतात की नमते घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here