निवडणूक प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे महिला मतदारांची संख्या वाढली

0

अहमदनगर दि. ३० : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण सुधारित कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय तसेच संबंधित मतदान केंद्रांवर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवडणूक प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील महिला मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची खात्री करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे.

जिल्हा निवडणूक प्रशासनाने राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे मतदार यादीत ५३ हजार ८३० मतदारांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे वाढ झालेल्या मतदारांमध्ये महिला मतदारांची संख्या  ३३ हजार ५१४ पेक्षा अधिक आहे. विशेष संक्षिप्त पुनरिक्षण सुधारित कार्यक्रमाआधी ६ ऑगस्ट रोजी जिल्ह्याची मतदारसंख्या ३६ लाख ७३ हजार ९६९ होती. प्रशासनाने महिला मतदार नोंदणीसाठी विशेष शिबीर, समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी सुट्टीच्या दिवशी शिबिराचे आयोजन, महाविद्यालय आणि सामाजिक संस्थांचा सहभाग, उद्योगसंस्थांचा सहभाग असे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याने अंतिम मतदार यादीत मतदारांची संख्या ३७ लाख २७ हजार ७९९ एवढी झाली आहे. त्यापैकी ९ हजार २८७ पुरूष आणि ३१० महिला असे एकूण ९ हजार ६८७ सैनिक मतदार आहेत तर इतर मतदारांची संख्या २०६ एवढी आहे.

लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविणे, प्रक्षेपित लोकसंख्येनुसार विशिष्ट वयोगटातील लोकसंख्येनुसार मतदार नोंदणी करुन घेणे आणि वगळण्याबाबत नियोजन, समाजातील भटक्या व विमुक्त जाती, महिला, तृतीयपंथी व्यक्ती व महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांच्या नोंदणीवर भर, मतदार यादी शुद्धीकरणाच्या अनुषंगाने मयत, दुबार स्थलांतरील मतदारांची पडताळणी योग्यरित्या करण्यासाठी मोहीम स्तरावर काम केल्याने अपेक्षित कामगिरी करणे शक्य झाले आहे.

*शेवगाव विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदार*

अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यात शेवगाव विधानसभा मतदारसंघात  १ लाख ९२   हजार ४४७ पुरूष आणि १  लाख ७६ हजार २९०  महिला असे  सर्वाधिक ३ लाख ६८ हजार ७४३ मतदार आहेत.  अकोले विधानसभा मतदारसंघात १ लाख ३७ हजार ६३६ पुरुष, १ लाख २५ हजार ३०५ महिला असे एकूण २ लाख ६२ हजार ९४२ मतदार आहेत. संगमनेरमध्ये १ लाख ४६ हजार ६२३  पुरूष, १ लाख ३८ हजार ४१५ महिला असे एकूण २ लाख ८५ हजार ४० मतदार आहेत. 

शिर्डीमध्ये १ लाख ४७ हजार ३७८ पुरूष, १ लाख ४० हजार ८३० महिला, असे एकूण २ लाख ८८ हजार २१६ मतदार आहेत. कोपरगावमध्ये १ लाख ४४ हजार ६०६ पुरूष, १ लाख ४० हजार ८८९ महिला असे एकूण २ लाख ८५ हजार ५०१ मतदार आहेत. श्रीरामपुरमध्ये १ लाख ५४ हजार ३१० पुरूष, १ लाख ५० हजार ९५० महिला असे एकूण ३ लाख ५ हजार ३२६ मतदार आहेत. 

नेवासामध्ये १ लाख ४४ हजार ८६० पुरूष, १ लाख ३४ हजार ८३० महिला असे एकूण २ लाख ७९ हजार ६९४ मतदार आहेत. राहुरीमध्ये १ लाख ६५ हजार २७५ पुरूष, १ लाख ५२ हजार १८८ महिला असे एकूण ३ लाख १७ हजार ४६४ मतदार आहेत.

 पारनेरमध्ये १ लाख ७८ हजार ७५३ पुरूष, १ लाख ६७ हजार २१४ महिला असे एकूण ३ लाख ४५ हजार ९७० मतदार आहेत. अहमदनगर शहरमध्ये १ लाख ५८ हजार ४३० पुरूष, १ लाख ५२ हजार ८०७ महिला असे एकूण ३ लाख ११ हजार ३४४ मतदार आहेत. श्रीगोंदामध्ये १ लाख ७४ हजार ३८३ पुरूष, १ लाख ६० हजार २८० महिला असे एकूण ३ लाख ३४ हजार ६६५ मतदार आहेत तर कर्जत-जामखेड  विधानसभा मतदारसंघामध्ये १ लाख ७९ हजार ६५८ पुरूष, १ लाख ६३ हजार २३६ महिला असे एकूण ३ लाख ४२ हजार ८९४ मतदार आहेत. 

*वयोवृद्ध मतदारांच्या पडताळणीसाठी प्रत्यक्ष भेटीवर भर*

घरोघरी पडताळणी मोहिमेत नोंदणी न केलेले पात्र मतदार, संभाव्य मतदार, एकापेक्षा अधिक नोंदी, मयत मतदार, कायमस्वरुपी मयत मतदार यांची माहिती अद्ययावत करण्यावर भर देण्यात आला. ८० वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या  मतदारांच्या  बाबतीत वारंवार आढावा घेऊन प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली. जागेवर न आढळणाऱ्या आणि  स्थलांतरीत मतदारांची केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत  पडताळणी करुन वगळणी करण्यात आली. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमातंर्गत एकूण 16 हजार 516  मतदारांची वगळणी  करण्यात आली.

*मतदार नोंदणी सुरूच राहणार*

अंतिम यादी प्रसिद्धीनंतरही सततचे पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत १ जुलै २००४ रोजी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या मतदारांची नाव नोंदणी सुरू राहील.नवीन मतदार नाव नोंदणी करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या https://voters.eci.gov.in  या संकेतस्थळावर नमुना क्र.६ भरावा.  उपलब्ध आहे.  मतदार यादीत आपले नाव तपासण्यासाठी www.ceo.maharashtra.gov.in  आणि www.electoralsearch.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. 

वोटर्स हेल्पलाईन ॲपचादेखील नाव नोंदणी व नाव शोधण्यासाठी उपयोग करता येईल. मतदार नोंदणीचे अर्ज जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयातही उपलब्ध आहेत. मतदार नोंदणीसाठी आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) अथवा तहसिल कार्यालयात संपर्क साधावा. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना आणि राजकीय पक्षांनी आपल्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींद्वारे मतदारांना नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. सालीमठ यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here