संगमनेर : आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी आपल्या बारा वर्षाच्या कारकिर्दीत विविध प्रश्नांच्या केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे अनेकांचे प्रश्न मार्गी लागले असून हाच कार्यकर्तृत्वाचा वारसा आपण सिद्ध करत पाचही जिल्ह्यातील सर्व पदवीधर मतदारांचा विश्वास सार्थ करून सर्वांचा नेता नव्हे नवा मित्र बनणार असल्याचा ठाम विश्वास अपक्ष युवा उमेदवार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केला.
जळगाव जिल्ह्यातील फैजपूर ,यावल, भुसावळ ,जामनेर, चाळीसगाव येथे मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते.यावेळी बोलताना सत्यजित तांबे म्हणाले की ,नाशिक पदवीधर मतदारसंघ हा मोठा विस्तीर्ण आहे. या मतदारसंघात ५४ तालुके येत असूनही आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी प्रत्येक तालुक्यातील नागरिकांशी केलेला संपर्क ,प्रत्येकाशी जोडलेले नाते यामुळे या मतदारसंघाचे आणि तांबे परिवाराचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झालेले आहे.अपक्ष म्हणून उमेदवार असलो तरी पक्षविरहित सर्व लोक एकत्र येऊन आपल्याला पाठिंबा देत आहेत. नागरिकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. डॉ. तांबे यांच्या कार्यकर्तृत्वाचा वारसा घेऊन पाचही जिल्ह्यातील नागरिकांचा विश्वास आपण सार्थ ठरवून प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा नवा मित्र बनणार आहोत.याचबरोबर आगामी काळात सर्वात महत्त्वाचा जुन्या पेन्शनसाठीचा प्रश्न मार्गी लावण्यास आपला प्राधान्य राहील. जुन्या पेन्शन बाबत काही शासकीय अधिकाऱ्यांकडून सरकारला चुकीची आकडेवारी दिली जात असून याचा एकदम बोजा शासकीय तिजोरीवर न पडता ते टप्प्याटप्प्याने पडणार आहेे. छत्तीसगड आणि राजस्थानचा पॅटर्न महाराष्ट्रात लागू करण्यासाठी आपण स्वतः एका वरिष्ठ शिष्ट मंडळासह जाऊन शासनाला ही पटवून देणार आहोत. मला नक्की खात्री आहे की जुन्या पेन्शन योजना मार्गे लागल्याने ील १७ लाख कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आपल्याला यश येईल.याचबरोबर पाचही जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावी शाळा ऑनलाईन पद्धतीने एकत्र जोडून करिअर मार्गदर्शन बाबत एक विशेष पॅटर्न आपण राबवणार आहोत. आपण २२ वर्षे समाजकारण आणि राजकारणात तरुणांसाठी काम केले असून बेरोजगारीचा महत्त्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा निहाय ज्या एमआयडीसी आहेत त्यामध्ये अधिक सुविधा निर्माण करून चांगले उद्योग या ठिकाणी येतील आणि त्याचा फायदा स्थानिक लोक तरुणांना होईल यासाठी आपले पहिले प्राधान्य राहणार आहे.विविध क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न आव्हान घेऊन ते सोडवण्यासाठी आपण काम करणार असल्याचे ते म्हणाले.