कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुकयातील कोळपेवाडी परिसरासह पंचक्रोशीतील छोट्या मोठ्या व्यावसायिकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करणाऱ्या पद्मविभूषण डॉ.शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेने वेगवान प्रगती करून विविध डिजिटल व इतर सेवा, योग्य कर्ज नियोजन व वसुली, उत्पादक गुंतवणूक या मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ॲम्बी व्हॅली लोणावळा येथे संपन्न झालेल्या दिमाखदार सोहळ्यात ‘बॅंको ब्ल्यू रिबन’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील पतसंस्था ३५ ते ४0 कोटी ठेवीच्या गटातील पुरस्कार मा.सहकार आयुक्त, आहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत दळवी (महासंचालक यशदा), गॅलेस्की इन्माचे अशोक नाईक, बॅंको मासिकाचे संपादक अविनाश शिंत्रे आदी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.संस्थेच्या वतीने चेअरमन देवेंद्र रोहमारे, संस्थेचे संचालक वीरेंद्र शिंदे व मॅनेजर मंगेश देशमुख यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
पुरस्कार मिळाल्याबद्दल चेअरमन देवेंद्र रोहमारे यांनी सांगितले की, संस्थेचे मार्गदर्शक मा.आ.अशोकराव काळे व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असून बँकेचे कर्जदार, ठेवीदार यांच्या विश्वासाला पात्र ठरली आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार काटेकोरपणे कामकाज करीत असतांना स्पर्धेच्या युगात बँकेच्या ग्राहकांना सुविधा पुरविण्यात पतसंस्था आघाडीवर असून त्यासाठी संस्थेचे चेअरमन, व्हा.चेअरमन, सर्व संचालक व कर्मचारी अथक परिश्रम घेत आहेत. त्या परिश्रमातून मिळालेल्या पुरस्कारामुळे अधिकच्या कामासाठी उर्जा मिळणार आहे.
पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेस ‘बॅंको ब्ल्यू रिबन’ पुरस्कार मिळाल्याबद्दल मा.आ.अशोकराव काळे, आ.आशुतोष काळे यांनी संस्थेचे चेअरमन, व्हा.चेअरमन सर्व संचालक मंडळ व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.