पशुधनाच्या आरोग्याबाबत शेतकऱ्यांमध्ये अधिक जागृती व्हावी – रणजीतसिंह देशमुख

0

संगमनेर : काँग्रेेेसचे विधिमंडळ गटनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा दुधाचा तालुका म्हणून ओळखला जात असून दररोज तालुक्यात सुमारे सात लाख लिटरची दूध निर्मिती होत आहे. या तालुक्यात पशुधन मोठे असून त्यांच्या आरोग्याबाबत सर्व शेतकऱ्यांमध्ये अधिक जाणीव, जागृती होण्याकरीता स्थानिक दूध संस्थांचे सचिव, पर्यवेक्षक यांच्यासहित सर्वांनी अधिक काम करावे असे आवाहन राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांनी केले.

           संगमनेर तालुका सहकारी दूध संघ राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ व आनंद यांच्या संयुक्त विद्यमाने पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी  राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाचे राहुल नायर, डॉ.शुभांकर नंदा, डॉ.सागर श्राफ, सौ.सीमा माथुर, डॉ.सरोज वहाने ,दूध संघाचे कार्यकारी संचालक डॉ.सुजित खिलारी आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
            यावेळी बोलताना रणजितसिंह देशमुख म्हणाले की, दुग्ध व्यवसाय हा संगमनेर तालुक्याचा मुख्य व्यवसाय आहे. आणि याच व्यवसायामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी निर्माण झाली आहे.तालुक्यात पशुधन मोठे आहे. मात्र त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. यामध्ये गाई, म्हैस यामधील वांझपणा बाबत उपचार करणे, खनिज मिक्सरचे दुधाळ गाईंमध्ये महत्त्व, हिरवा व कोरड्या चाऱ्याचे महत्त्व, कालवडीचे संगोपन ,गोठ्याचे व्यवस्थापन, चारा व्यवस्थापन, घरच्या घरी खाद्य बनवायच्या पद्धती याबाबतही अधिक माहिती दूध उत्पादका पर्यंत पोहोचवली पाहिजे. पशुंच्या आरोग्याची  काळजी घेतली जाईल तितके त्या दूध उत्पादन जास्त देतील असे सांगतानाच या कामी सर्व गावांमधील दूध संस्थांचे सचिव, पशुवैद्यकीय अधिकारी व संबंधितांनी अधिक योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
            डॉ.राहुल नायर म्हणाले की , राजहंस दूध संघाने मुक्त संचार गोठा ही संकल्पना प्रभावीपणे राबवली असून यामुळे गायींच्या आरोग्यामध्ये मोठी सुधारणा झाली आहे.  नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून द्यावी असेही ते म्हणाले. यावेळी डॉ.शुभांकर नंदा ,डॉ.सागर श्रॉफ, डॉ.सीमा माथुर, डॉ.सरोज वाहने यांनीही मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक डॉ.सुजित खिलारी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here