कोपरगाव : शहराच्या नागरिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला पाणी प्रश्न आणि तो सोडविण्यासाठी पर्याय असलेला क्रमांक पाच या साठवण तलावाचे बंद असलेले काम तात्काळ सुरु करण्यात यावे यासाठी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी दालना समोर सत्याग्रह करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी दिला आहे.
काळे यांनी म्हटले आहे की कोपरगाव नगरपरिषदेच्या येसगाव येथील पाचव्या साठवण तलावाचे काम सुरु करण्यासाठी मी समृध्दीच्या ठेकेदाराकडे पाठपूरावा केला. मात्र तालूक्याच्या राजकीय नेतृत्वाच्या श्रेयवादात काम अडकले होते. मोठ्या पाठपुरवठ्यास नंतर अखेर ठेकेदार माती उचलून घेऊन गेला. पण दगड लागला आणि ठेकेदार थांबला. कारण विचारले तर ठेकेदार दगड नको म्हणतो म्हणून सांगितले गेले. मात्र ठेकेदार मला कायम म्हणायचा मला मातीत रस नाही दगड पाहिजे .
आपण समृध्दीच्या ठेकेदाराला फुकट दगड घेऊन जाऊन फुकट तलाव क्रमांक ५ खोदून देण्यासाठी तयार केले. निविदा सुद्धा मंजूर झाली व तलावासाठी ५४ कोटी मंजूर झाले. ठेकेदाराने काम सुरू केले . दरम्यान राज्यात शासन बदलले..
१७ नोव्हेंबर २०२२ पासून तलावाचे खोदकाम ठेकेदाराने बंद केले आहे. याबाबत पालिका प्रशासनास विचारले असता ठेकेदार गुजरातचा आहे आणि सध्या गुजरातच्या निवडणूका चालू असल्यामुळे काम बंद असल्याचे बकवास कारण पालिकेकडून देण्यात आले होते , आता गुजरातच्या निवडणूक संपून दहा दिवस झाले आहे . असे असूनसुद्धा काम चालू होत नाही. कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सुटू नये म्हणून तलावाचे काम होऊ नये यासाठी अनेक जण त्यांचे शासनातील देव अगोदरच पाण्यात घालून बसले आहेत.
केवळ नियोजनाअभावी सध्या शहराला सात दिवसाआड पाणी पुरवठा सुरु आहे, आपण तात्काळ पाचव्या साठवण तलावाचे काम सुरु न केल्यास दिनांक २ जानेवारी २०२३ सोमवार रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मी आपल्या दालना समोर पाण्याचा रिकामा हंडा डोक्यावर घेऊन उभा राहणार आहे.
पावसाळ्या पूर्वी काम होण्यासाठी प्रत्येक दिवस महत्वाचा असताना आपण एक महिना काम बंद ठेऊन शहर पाणी योजनेच्या आड येत असल्याचा स्पष्ट आरोप काळे यांनी यावेळी केला .