पाच गावांच्या संयुक्त पाणीपुरवठा योजनेचे काम गतीने पूर्ण करा – स्नेहलताताई कोल्हे

0

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील धारणगाव, जेऊर पाटोदा, मुर्शतपूर, हिंगणी व चांदगव्हाण या पाच गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनअंतर्गत संयुक्त पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे या पाच गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार असून, त्यामुळे या योजनेचे काम दर्जेदार पद्धतीने लवकरात लवकर पूर्ण करावे, अशा सूचना माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

स्नेहलताताई कोल्हे यांनी आज नववर्षाच्या पहिल्या दिवशी १ जानेवारी रोजी धारणगाव येथे भेट देऊन धारणगाव, जेऊर पाटोदा, मुर्शतपूर, हिंगणी व चांदगव्हाण या पाच गावांसाठी केंद्र शासनाच्या जलजीवन मिशनअंतर्गत २९ कोटी ६२ लाख रुपये खर्चून राबविण्यात येणाऱ्या संयुक्त पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी केली. त्यांनी गावातील विकास कामे व विविध समस्यांबाबत ग्रामपंचायतचे पदाधिकारी व ग्रामस्थांसोबत चर्चा केली. यावेळी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दगुराव चौधरी, संचालक रमेश घोडेराव, दीपक चौधरी, सरपंच करुणा दीपक चौधरी, उपसरपंच गणेश थोरात, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी शेखर मेटकरी, जयंती सुपर कन्स्ट्रक्शन कंपनीचे शंकर, संदीप चव्हाण, रमाकांत वाकचौरे, संपत वहाडणे, सोपानराव वहाडणे, दीपक सुरे, अंबादास देवकर, संदीप चौधरी, दीपक वाघ आदींसह धारणगाव, जेऊर पाटोदा, मुर्शतपूर, हिंगणी, चांदगव्हाण येथील ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.

 कोपरगाव मतदारसंघातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत होती. ही समस्या सोडविण्यासाठी आपण विधानसभा सदस्यत्वाच्या कार्यकाळात मतदारसंघातील अनेक गावांतील पाणीपुरवठा योजनांसाठी केंद्र व राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून कोट्यवधींचा निधी मंजूर करवून आणला. त्यातून अनेक गावांतील पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्या असून, तहानलेल्या नागरिकांची तहान भागविल्याचे व पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करणाऱ्या महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविल्याचे मला मोठे समाधान आहे. या पाणीपुरवठा योजनेचे काम दर्जेदार होण्यासाठी सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी लक्ष द्यावे. या योजनेसंदर्भात काही अडचणी आल्या तर त्या दूर करण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here