कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव मतदार संघात सुरू असलेल्या अनेक गावातील रेंगाळलेल्या पाणी पुरवठा योजनांचे काम तातडीने पूर्ण करा.ज्या पाणी पुरवठा योजनांची कामे सुरू झाली नाहीत ती कामे तातडीने सुरू करा.कामात हयगय झाल्यास कोणत्याही अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही अशी तंबी आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव मतदार संघातील अनेक गावात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषद अंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनांच्या कामाचा आढावा आ.आशुतोष काळे यांनी घेतला यावेळी बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना करून कामात हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे चांगलेच कान उपटले.
यावेळी आ.आशुतोष काळे यांनी मतदार संघातील जिल्हा परिषद अंतर्गत मंजूर असलेल्या ३३ पाणीपुरवठा योजना व महाराष्ट्र जिवन प्राधिकरण अंतर्गत चास नळी, कुंभारी,कोळपेवाडी, मळेगाव थडी, मायगाव देवी, रवंदे, रुई-शिंगवे, शिंगणापूर, सुरेगाव,वारी-कान्हेगाव,जेवूर कुंभारी, पुणतांबा, रांजणगाव देशमुख, धारणगाव तसेच पिंपळवाडी-नपावाडी पाणी पुरवठा योजनेचा देखील आढावा घेतला. अधिकाऱ्यांना सूचना करतांना ते म्हणाले की,रेंगाळलेल्या पाणी पुरवठा योजनांच्या कामांना गती देवून सुरळीतपणे कामे सुरू करा.कामांची गुणवत्ता वर्क ऑर्डर प्रमाणे होत असल्याची वेळच्या वेळी खात्री करा.ज्या पाणी पुरवठा योजनांच्या वर्क ऑर्डर देवून देखील अद्याप काम सुरू झाले नाही त्या ठेकेदारांना तातडीने नोटिसा देवून लवकरात काम सुरू करा.सर्व नागरिकांना नळाच्या माध्यमातून पाणी पोहोचेल योजनेचा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून वाड्या वस्त्यांवरील नागरिकांना नळाद्वारे कायमस्वरूपी पाणी पुरवठा होईल अशा पद्धतीने नियोजन करून पाणी पुरवठा योजनांचे काम लवकरात लवकर पूर्ण करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे, संचालक सुधाकर रोहोम, राहुल रोहमारे, अनिल कदम, श्रावण आसने, जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनराव काळे, माजी सदस्य मधूकर टेके, महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, गौतम बँकेचे संचालक बाबुराव थोरात, राजेंद्र औताडे, नंदकिशोर औताडे, गोपीनाथ रहाणे, सुनील कुहिले, लक्ष्मण थोरात, नानासाहेब नेहे, महेंद्र वक्ते, बापूसाहेब वक्ते, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी प्रशांत कदम, शेखर मिटकरी, पंचायत समिती बांधकाम विभागाचे संतोष दळवी, बाळासाहेब साबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता चांगदेव लाटे तसेच सर्व शाखा अभियंता उपस्थित होते.