पाण्यातील विद्युत पम्प चोरणारे शेतकऱ्यांनी रंगेहाथ पकडले

0

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

             पाण्यातील मोटार व पाईप चोरून नेत असतान दोघां भामट्यांना सुधाकर चोरपडे यांनी रंगेहाथ पकडले. दोन्ही भामटे दिनांक २ एप्रिल रोजी रात्रीच्या दरम्यान सडे शिवारातील देवनदी येथे चोरी करताना आढळून आलेत. सुधाकर चापाजी घोरपडे, वय ६९ वर्षे, रा. सडे, ता. राहुरी. यांची सडे ता. राहुरी गावाचे शिवारात शेत गट नंबर ४०५ मध्ये शेत जमीन आहे. शेत जमीनीस पाणी देण्यासाठी त्यांनी देव नदी वरील बंधा-यावरुन पाईप लाईन आणलेली असुन बंधा-यावर ईलेक्ट्रीक मोटरी बसविलेल्या आहेत. 

           दि. २ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास सुधाकर घोरपडे हे देव नदी वरील बंधा-यावर असलेल्या मोटरी पाहण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी त्यांना काही अंतरावर असलेल्या बाबासाहेब बाबुराव धोंडे, रा. सडे, ता. राहुरी यांची देव नदी वरील बंधा-यात असलेली पाणबुडी मोटर व मोटरीचा पाईप दोन अनोळखी इसम चोरत असतांना दिसून आले. त्यांनी ताबडतोब बासाहेब धोंडे यांना फोनद्वारे सदरचा प्रकार सांगीताला. त्यानंतर काही वेळातच बाबासाहेब धोंडे, जयराम बाबुराव धोंडे, शांताराम घोरपडे व इतर लोक त्या ठिकाणी आले व सदर दोन अनोळखी इसमांना जागीच पकडले. त्यानंतर त्यांनी राहुरी पोलीस स्टेशनला संपर्क केला असता काही वेळातच राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस त्या ठिकाणी गेले व त्यांनी दोन अनोळखी इसमांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांचे नाव हरिभाउ गोरख माळी, वय ३६ वर्षे, रा. शिंगवेतुकाई, ता. नेवासा. तसेच रावसाहेब नामदेव पिंपळे, वय ४५ वर्षे, रा. टाकळीकाझी, ता. जि. अहमदनगर असे असल्याचे सांगीतले. 

        सुधाकर चापाजी घोरपडे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी हरिभाउ गोरख माळी, वय ३६ वर्षे, रा. शिंगवे तुकाई, ता. नेवासा. तसेच रावसाहेब नामदेव पिंपळे, वय ४५ वर्षे, रा. टाकळीकाझी, ता. जि. अहमदनगर या दोघांवर गुन्हा रजि. नं. ३४९/२०२३ भादंवि कलम ३७९, ५११ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांना गजाआड करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मेघःशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here