नगर – अखंड रामवाडीच्यावतीने लक्ष्मीआईची पारंपारिक यात्रा उत्सव सोमवती आमवस्यानिमित्त मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रामवाडी (सर्जेपुरा) येथील लक्ष्मीआईच्या मंदिरातील देवीच्या मुर्तीला सालाबादप्रमाणे सकाळी गंगेच्या जलाने अभिषेक करण्यात आला. विशेष सोमवती आमावस्यानिमित्त गंगेच्या पाण्याने स्नान करण्याचे महत्व आहे. पारंपारिक वाद्याच्या गजरात महापुजा आरती करण्यात आली. यंदाच्या वर्षी चांगला पाऊस पडू दे….. धन धान्यासह सुख-समृद्धी येऊ दे अशी लक्ष्मीआईला प्रार्थना करण्यात आली.
यात्रेच्या निमित्ताने मंदिराला रंगरंगोटी देऊन सजविण्यात आले होते. मंदिरावर विद्युत माळेची सजावट केली होती. प्रवेशव्दारात भव्य कमान तर मंदिरापर्यंत मंडप टाकून सजावट केली होती.
गाभार्यातील मुर्तीला हिरवी साडी, चुडा, मंगळसूत्र, पुष्यमाला, वेणी, गजराने सजविले होते. पूजेची मुर्तीसाठी असेच सजविण्यात आले होते. पूजेची मुर्ती रथातून मिरवणुकीला नेण्याची प्रथा आहे. रामवाडी पासून काढण्यात आलेली रथयात्रा मिरवणुक एस.टी.वर्कशॉप, कोठला, मंगलगेट, बेलदार गल्ली, सर्जेपुरा, रंगभवन, हत्ती चौक मार्गेपुन्हा रामवाडीत येऊन मिरवणुकीचा समारोप झाला.
पारंपारिक वाद्याच्या गजरात पोतराजाचे पारंपारिक आसूड फिरवित नृत्य या मिरवणुकीचे आकर्षण होते. माजी नगरसेवक भाऊसाहेब उडाणशिवे यंदाही मिरवणुकीत पोतराजाचा साज चढवून सामिल झाले होते. सौभाग्यवतींनी तांबाच्या जलाने भरलेल्या कळशा त्यावर लिंबाचा पाला, डोक्यावर ठेवून त्या रथापुढे होत्या, तर अनेक लहान मुलींसह स्त्रीयांनी पारंपारिक साडी, साज श्रृंगारसह मराठमोळ्या वेषात फेर धरुन तर फुगडी खेळून मिरवणुकीत शोभा आणली.
पोतराज, भक्तगण, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. तरुणांचा जोष ड़िज़ेमुळे उत्साहात होता. भाऊसाहेब उडाणशिवे हे दरवर्षी यात्रा उत्सवाचे आयोजन करुन मिरवणूक काढतात. त्याप्रमाणे यंदाही यात्रा उत्सव मिरवणुकीसह उत्साहात साजरा झाला. मिरवणुकीनंतर भाविकांसाठी भंडार्यांचे आयोजन करण्यात आले होते. पुरणपोळीचा गोड नैवद्य लक्ष्मी आईला आणि गाडीवाणच्या मुर्ती समोर ठेवण्यात आला होता. भाविकांनी व परिसारातील नागरिकांनी सकाळपासून दर्शनासाठी आणि नैवेद्य दाखविण्यासाठी मंदिरात गर्दी केली होती. भाविकांसह परिसरातील नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या यात्रेत कचरा वेचक सहभागी होते.
या यात्रेचे नियोजन माजी नगरसेविका सौ.गिरीजाबाई उडाणशिवे, विकास उडाणशिवे, पोतराज संघटनेचे जिल्हाध्यक्ष किरण खुडे, उपाध्यक्ष लखन लोखंडे, तसेच पोतराज सर्वश्री सुनिल चांदणे, बबन लोखंडे, विनोद गाडे, ऋतिक शेरकर, पवन शेरकर, वाद्य- वाजंत्रीकार सागर खुडे, विशाल वैरागर, राहुल वैरागर, शामराव साबळे, बापू शिंदे आणि यात्रा कमिटीतील सदस्य सर्वश्री सागर साठे, प्रकाश वाघमारे, संजू परदेशी, पप्पू उल्हारे, विकास धाडगे, सतिष साळवे आदिंनी करुन परिश्रम घेतले.