कोपरगांव प्रतिनिधी :
रामायणांत अयोध्येची राजसत्ता मोठे बंधु रामाची होती, चौदा वर्षे वनवास त्यांच्या पदरी आल्याने लहान बंधु भरताने त्याचा हव्यास न धरता त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवत राज्य केले. पण हल्ली कलीयुगात भाऊ भावाचे वैरी होत आहे, तेंव्हा हे चित्र बदलण्यासाठी कुटूंबातील नात्याला महत्व द्या, दुराचारी शिकवण मनांत बाळगु नका, पारमार्थिक सेवेत आत्मानंद आहे, ती कधीही वाया जात नाही असे प्रतिपादन साध्वी सोनालीदिदी कर्पे यांनी केले.
शहरातील संत ज्ञानेश्वरनगरी तहसिल कार्यालय मैदानावर माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या तिस-या पुण्यतिथीनिमीत्त कल्याणस्वामी संस्थान चकलंबा (गेवराई-बीड) अन्नपुर्णा माता मुलींची वारकरी शिक्षण संस्थेच्या संस्थापिका, साध्वी सोनालीदिदी कर्पे यांच्या रसाळवाणीतुन संगीतमय प्रभु श्रीरामकथेचे आयोजन करण्यांत आले असुन त्याचे पाचवे पुष्प गुंफतांना त्या बोलत होत्या. प्रारंभी सिध्देश्वर देवस्थान ट्रस्ट (मंजुर) चे दत्तात्रेयरत्न, महामंडलेश्वर शिवानंदगिरी महाराज यांनी उपस्थितांना या भागात रामायण काळात घडलेल्या घटनांची माहिती देवुन माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सुरूवातीच्या १९७० ते २००० या तीस वर्षाच्या काळात समाजातील अज्ञान दुर करून शेतीप्रगतीसाठी रात्रंदिवस कष्ट घेवुन आर्थीक सुबत्ता साधुन दारिद्रय दुर करण्यांचा प्रयत्न केला व तांत्रीक व्यवस्थापकीय शिक्षणाला महत्व देवुन सहकाराच्या माध्यमांतुन या भागाचा कायापालट करून नंदनवन बनविले त्यांचे कार्य गगनाएव्हढे मोठे असुन दुसरी आणि तिसरी पिढी त्यांचा वसा पुढे नेत आहे असे ते शेवटी म्हणांले. श्री श्री श्री १००८ धर्मनिष्ठ राजगुरू,महामंडलेश्वर महंत प.पुज्य शिवानंदगिरी महाराजांना नारायणगिरी महाराजांच्या नावांने दिला जाणारा गुरुप्रसाद पुरस्कार प्राप्त झाल्याबददल सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टच्यावतीने संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे व कोपरगांव तालुका स्वयंसहायता महिला बचतगटाच्या अध्यक्षा रेणुका विवेक कोल्हे यांनी उपस्थितांचे स्वागत करून संतपुजन केले. उद्योजक आदित्य सुरेश कोल्हे व सौ. प्रियांका आदित्य कोल्हे या उभयतांच्या हस्ते रामायणग्रंथ व साध्वी सोनालीदिदी कर्पे यांचे पुजन करण्यांत आले.
साध्वी सोनालीदिदी कर्पे पुढे म्हणाल्या की, मनुष्याचे आरोग्य बिघडले तर वैद्य दुरूस्त करतो पण मन बिघडले तर त्यावर कुठल्याच वैद्याचा उपाय चालत नाही त्यासाठी अध्यात्माच्या व्यासपिठावरून होणा-या कथाच बिघडलेल्या मनांला स्थिर करतात
माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी शेती, सहकार, सिंचन, शिक्षण, सांस्कृतीक वैद्यकिय, समाजकारण, राजकारण, अर्थ, व्यापार, उद्योग, आधुनिकीकरण, जागतिकीकरण, बँकींग, संशोधन, अध्यात्म, धार्मीक आदि क्षेत्रात आपल्या ज्ञानाचा ठसा उमटवत न भूतो न भविष्यती असे काम करून ठेवले आहे.
संतसेवा कधीही व्यर्थ जात नाही. चांगले करा चांगले फळ मिळते, वाईट केले तर वाईट फळ मिळते. राम वैभवात होते पण त्यांच्या नशिबी प्रारब्धांने वनवास आला. प्रारब्ध आपल्याला बदलता येत नाही त्यातील अडचणी ईश्वरीय सेवेतुन कमी करता येतात. विश्वाचा मालक राम आहे. लक्ष्मणासारखा भाउ त्यांना लाभला. मोठयांबददल आदर कसा ठेवावा याची शिकवण रामायणातुन मिळते. वनवास काळात आर्युवेद पंडीत अत्री ऋषींनी सीतामाईला न सुकणा-या फुलांचा हार आणि कधीही मलीन न होणारी साडी भेट म्हणून दिली होती तर त्यांच्या पत्नी सती अनुसया यांनी त्यांच्या कपाळाचे कुंकू सीतेला दिले होते. राजा दशरथ (राम), वसुदेव (कृष्ण), छत्रपती शिवाजी महाराज (छत्रपती संभाजी) या तिघांनाही पुत्र वियोगाला जीवंतपणीच सामोरे जावे लागले असे सांगुन त्यांनी महिलांना घरात सुख समृध्दी नांदावी यासाठी तिन्ही साजांच्या वेळेला घर कधीही झाडु नये, दररोज गायीला गोग्रास द्या, सायंकाळच्या स्वयंपाकाआधी हरिपाठ म्हणांवा आणि दुस-याची छत्री, चप्पल, कुंकवाचा करंडा कधीही घरी आणू नये, रात्रीची भांडी खरकटी ठेवु नये या बोधप्रद गोष्टी सांगितल्या. झाकीद्वारे तयार केलेल्या लक्ष्मणाने शुर्पनखेचे नाक कापले हा प्रसंग अबाल वृध्दांना भावला टाळयांच्या कडकडाटात भाविकांनी मनांपासुन त्याला दाद दिली. प्रणवनंदगिरी महाराज (इंदौर) राघवेश्वर महाराज (कुंभारी) स्वामी समर्थ केंद्र कारवाडीचे संतोष जाधव, राहुल महाराज शिंदे आदि संत महंतांचेही पुजन करण्यांत आले. कथा श्रवणांसाठी आलेल्या महिलांसह पुरूषांनी आकाशी वस्त्र परिधान केल्याने उपस्थिती खुलून दिसत होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत तालुक्यातील चांदेकसारे येथील कुमारी प्रियांका कैलास ताते हिने उज्वल यश संपादन केल्याबददल तिचा सौ. रेणुका विवेक कोल्हे व साध्वी सोनालीदिदी यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला.