नाशिक येथील पोलिस परेड मैदानावरील ध्वजारोहण सोहळ्यात पुरस्कार वितरण
शिर्डी, २६ जानेवारी (उमाका वृत्तसेवा) – महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या वतीने देण्यात येणारा “छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार – २०१९” कोपरगाव येथील सूर्यतेज संस्थापक आणि वृक्ष पर्यावरण प्रेमी, भारत सरकारचे स्वच्छतादूत सुशांत घोडके यांना पालकमंत्री दादाजी भुसे यांचे हस्ते वितरण करण्यात आला आहे. नाशिक येथील पोलिस परेड मैदानावर जिल्ह्याचे मुख्य ध्वजारोहण नंतर या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि पन्नास हजार रुपये असे या पूरस्काराचे स्वरूप आहे. वनश्री सुशांत घोडके यांना राज्यस्तरीय व्यक्तींमध्ये दूसरा तर नाशिक विभागाचा प्रथम अशा दोन पुरस्कारांचा समावेश आहे. नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे यांचे हस्ते नाशिक विभागाच्या छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन २०१८ व २०१९ चे वितरण करण्यात आले. या प्रसंगी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विभागीय पोलीस महासंचालक बी. जी. शेखर पाटील यांचेसह नाशिक येथील विविध खात्यांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र शासन वन विभागाने वृक्षारोपण आणि पर्यावरण क्षेत्रातील व्यक्ती, संस्था यांनी जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज वनश्री नाशिक विभाग पुरस्काराचे वितरण करण्यात आले.राज्यात वृक्षारोपण,वृक्षसंवर्धन, पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला पुरस्कार दिला जातो.
नाशिक विभागाचा प्रथम क्रमांकाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री वनश्री पुरस्कार २०१९ स्विकारतांना त्यांचे वडील प्रकाश, आई अर्चना, लहान बंधू तन्मय हे त्यांचे समवेत होते. पुरस्कार वितरण नंतर नाशिक जिल्ह्यातील पर्यावरण प्रेमी आणि अधिकारी यांनी वनश्री सुशांत घोडके यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
शिर्डी उपविभागासह कोपरगाव तालुक्यात स्वच्छतादूत आणि पर्यावरण प्रेमी म्हणून सुशांत घोडके यांचे कार्य अनेक वर्षांपासून सर्वांना परिचित आहे.हरित सेनेच्या माध्यमातून वृक्षारोपण आणि संवर्धन माध्यमातून सुशांत घोडके यांनी कोपरगावसह खेड्यापाड्यात रुजवलेली वृक्षारोपण चळवळ, विविध पक्षी, प्राणी यांना दिलेले जीवदान,वन्यजीवांच्या संरक्षणासाठी केलेली जनजागृती केली आहे.पक्षी व पर्यावरणास हानीकारक नायलाॅन धाग्यावर प्रखर जनजागृती त्यांनी केली आहे.कडूलिंबाचे महत्व जाणून ३३ हजार पेक्षा जास्त रोपांचे वितरण,रोपण आणि पालकत्व दिले आहे.या शिवाय लोकसहभागातून शाळा व सार्वजनिक ठिकाणी फुल झाडांची उद्यान विकसित केले आहे.शाळा, महाविद्यालय,वसतीगृह यासह सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करून संवर्धनाचे कार्य उल्लेखनीय आहे.पक्षी आणि वन्यजीव संरक्षणासाठी त्यांची नेहमी धडपड असते.पर्यावरण प्रेमी सुशांत घोडके यांची वृक्षारोपण आणि संवर्धनासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. अनेकांचे ते प्रेरणास्रोत आहे त्यांना समाजरत्न, नाट्य मंदार यासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कारही वनश्री सुशांत घोडके यांना जाहीर असून लवकरच या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार राज्यस्तरीय व्दितीय व विभागीय प्रथम एकाच वेळी घोषित झालेले अहमदनगर जिल्ह्यातील ते पहिले व्यक्ती ठरले आहे. शिर्डी उपविभागात त्यांचे पर्यावरणावर उल्लेखनीय कार्य आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे नावाने दिलेला वनश्री पुरस्कार हा माझे सोबत काम करणाऱ्या प्रत्येक वृक्ष व पर्यावरण प्रेमींचा हा सन्मान आहे.माझ्या अनेक सार्वजनिक कार्यात साथ देणारे आई- वडील, कुटुंबिय,वृक्ष मित्र,ज्ञात – अज्ञात घटक, पर्यावरण प्रेमी नागरिक शिर्डी उपविभागासह कोपरगांव तालुकावासियांना हा पुरस्कार समर्पित आहे. अशी प्रतिक्रिया सुशांत घोडके यांनी दिली आहे.