कोपरगाव – येथील एस. एस. जी. एम. महाविद्यालयात नुकताच विद्यार्थी विकास मंडळ व दिव्यांग विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक दिव्यांग दिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून
कोपरगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख आणि सामाजिक कार्यकर्ते, लायन्स क्लब मूकबधिर विद्यालयाचे डुकरे सर हे उपस्थित होते.
उपस्थिताना संबोधित करताना श्रीमती शेख यांनी सांगितले की, पालकांनी आपल्या दिव्यांग मुलांना समजून घेणे व प्रेरित करणे आवश्यक आहे, तर डुकरे सर यांनी व्यंगाचे २१ प्रकार असल्याचे सांगून दिव्यांगांना बँकेमधून कर्ज वगैरे
सुविधा मिळविताना येणाऱ्या समस्यांचा उहापोह केला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.परमेश्वर कराळे यांनी दिव्यांगांविषयीचे कायदे, शिक्षण व लढा याविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्षीय मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. रमेश सानप यांनी, व्यंगाचे वेळीच निदान व उपचार होणे किती गरजेचे असते हे उदाहरणाद्वारे सांगून, या अभावी उत्पन्न होणाऱ्या समस्यांची जाणीव करून दिली.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. रंजना वर्दे यांनी तर सूत्रसंचालन प्रा.देवकाते यांनी केले .प्रा. माधव यशवंत यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या सर्व शाखांचे उप प्राचार्य, कार्यालयीन अधीक्षक, शिक्षक, शिक्षकेतर सेवक यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.