पालिका निवडणुकीपर्यंत म्हाळुंगी पूल होऊ नये यासाठी भाजपाचे प्रयत्न – आमदार थोरात यांचा आरोप 

0

संगमनेर : संगमनेर नगरपालिका निवडणूक होईपर्यंत म्हाळुंगी नदीवरील खचलेल्या पुलाच्या दुरुस्तीचे काम होऊ नये यासाठी भाजपचे काही नेते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांच्याकडे प्रयत्न करत असल्याचा सनसनाटी आरोप राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला.

            पाच सात महिन्यापूर्वी संगमनेरच्या काही भागाला जोडणाऱा म्हाळुंगी नदीवरील पूल खचला आहे, त्याचे अजूनही दुरुस्तीचे घोंगडे भिजत पडले आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेरातील काही माजी नगरसेवक आणि सजग नागरिकांनी सोमवारी या खचलेल्या पुलाजवळ आंदोलन करत पुलाच्या दुरुस्तीचे काम आठ दिवसात न सुरू केल्यास नगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी आमदार थोरात म्हणाले की, स्वामी समर्थ मंदिर ते साई मंदिर या दरम्यान म्हाळुंगी नदीवरील पूल दुर्दैवाने पडला आहे. पुराच्या पाण्याचा लोंढा मोठ्या प्रमाणात असल्याने पूल पडला. त्यामुळे अनेक नागरिकांची अडचण झाली आहे ही बाब नाकारता येणार नाही. या पुलाचे काम तातडीने मार्गी लागावे यासाठी मी माझ्या पातळीवर प्रयत्न केले मात्र राज्यात सरकार माझे नाही ही वस्तुस्थिती आहे. तरी देखील मी यासाठी आग्रही राहिलो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात पत्र दिले आणि निधी मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र काही मंडळी मुंबईत जाऊन नगरपालिका निवडणुका होईपर्यंत हा पूल होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहेत. या विषयावर आम्हाला आंदोलन करायच आहे अशी मांडणी ते मंत्रालयात करत आहेत. खरंतर सरकार त्यांचे आहे. त्यामुळे त्यांना या पुराचे काम करून घेण्यास कोणतीही अडचण नाही. पालिका निवडणुकीत भांडवल म्हणून या पुलाचा प्रश्न पुढे आणला जात आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत आपण हा प्रचाराचा मुद्दा करू शकतो असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगितले जात आहे. नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्याना आपण या संदर्भात सूचना दिल्या आहेत. केवळ मलाच नको तर भाजपचे एक ज्येष्ठ नेते आहेत त्यांचे मुंबईत वजन आहे त्यांना सुद्धा या कामाचे इस्टिमेट द्या त्यांच्याकडून काम होईल अशी अपेक्षा बाळगू शेवटी नागरिकांचे काम होण्यास महत्त्व आहे. त्याचे श्रेय आपण त्यांना देऊ असे देखील आमदार थोरात यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here