कोपरगाव : शहराच्या टाकळी रस्ता भागामध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः धुमाकूळ घातला , या कुत्र्याने संध्याकाळपर्यंत ५ जणांना चावा घेत गंभीर जखमी केले आहे. जखमीमध्ये बहुतांश लहानमुले आहेत. पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे .
आज संक्रातीच्या सणामुळे सगळीकडे पतंग उडविण्याची धूम सुरु असताना कापलेले पतंग पकडणारे मुलेही सगळीकडे पळत होते. पतंग पकडणारे मुले पळत असताना टाकळी रस्ता भागातील लक्ष्मीबाई कोपरे कॉलनीमध्ये अचानक पिसाळलेल्या कुत्र्याने या मुलांवर हल्ला करून चावा घेत जखमी केल्याची घटना घडली . यामध्ये दोन मुले गंभीर जखमी असल्याने त्यांना नगर येथील शासकीय रुग्णालयात हलविल्याचे जखमी मुलांच्या पालकांनी सांगितले . ग्रामीण रुग्णालयात अँटी रेबीज इंजेक्शन शिल्लक नाही ! या जखमी मुलांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता . तेथे प्राणी चावल्या नंतर द्यायचे अँटी रेबीज इंजेक्शन शिल्लक नसल्याचे समोर आले . त्यामुळे जखमी मुलांना अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात हलवावे लागले . यात दुर्दैवाची बाब म्हणजे येथील लॉंड्री व्यावसायिकाच्या मोठ्या मुलाला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला म्हणून ते त्याला नगर घेऊन चालले असताना अर्ध्या रस्त्यात असताना दुसऱ्याही मुलाला त्याच कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली . त्यामुळे दुसऱ्या मुलालाही नगर हलविण्याची वेळ या कुटुंबावर आली. एकीकडे शासकीय रुग्णालयात रेबीजचे हे महागडे इंजेक्शन शिल्लक नसल्याचे सांगितले जात असताना मात्र खाजगी रुग्णालयात सहज उपलब्ध आहे. केवळ शासकीय रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे सर्वसामान्य जनतेला ते न परवडणारे इंजेक्शन नाइलाजस्तव विकत घ्यावे लागत आहे.
पालिका प्रशासनाला फक्त कर पाहिजे, नागरी समस्याशी काही देणे घेणे नाही ! शहरामध्ये सध्या सर्वत्र भटक्या कुत्र्यांप्रमाणे भटक्या जनावरांचा सुळसुळाट झाला आहे. कधी भटक्या कुत्र्यांचा चावा तर कधी भटक्या गाई किंवा गाढवांची धडक बसून नागरिकांना जखमी व्हावे लागत आहे. परंतु नागरिकांच्या या समस्यांकडे पाहण्यासाठी पालिका प्रशासनाला वेळ नाही .