देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
छोट्या व्यावसायिकांनी आपली पत निर्माण करणे आवश्यक असून पीएम स्वनिधीच्या माध्यमातून मिळालेल्या संधीचा उपयोग करून आपला व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. असे मत देवळाली प्रवरानगर परिषदेचे मुख्याधिकारी अजित निकत यांनी व्यक्त केले.
देवळालीप्रवरा नगरपरिषदेच्या वतीने दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानच्या माध्यमातून पीएम स्वनिधी अंतर्गत लाभार्थींना केंद्र सरकार कडून प्राप्त झालेले परिचय बोर्ड व पंतप्रधान यांच्या शुभेच्छा पत्राचे वाटप करण्यात आले, त्यावेळीं मुख्याधिकारी निकत बोलत होते.
प्रशासकीय अधिकारी सुदर्शन जवक, वसुली विभाग प्रमुख मनोज पापडीवाल,डे एनयुएलएम चे सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी,समुदाय संघटक सविता हारदे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना मुख्याधिकारी अजित निकत म्हणाले की, शासनाकडून मिळणाऱ्या सोयी सुविधांचा लाभ घेण्यासाठी सर्व कर वेळेवर भरणे आवश्यक असून शहरातील विविध उपक्रमांमध्ये ही सहभागी होणे आवश्यक आहे.प्लास्टिक बंदी असल्याने दुकानदारांनी प्लास्टिकचा वापर करू नये.
यावेळी सुनील गोसावी यांनी प्रास्ताविक करताना सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती दिली व सर्वांनी बचत गटामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. सविता हारदे यांनी सर्वांचे स्वागत केले तर सुदर्शन जवक यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल संभाजी वाळके, नंदकुमार शिरसाठ, उदय इंगळे कृष्णा महांकाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.