अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एका पोर्न स्टारला पैसे दिल्याच्या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार संदर्भात गुन्हा दाखल (इनडिक्टमेंट) करण्यात आला आहे. हे प्रकरण 2016 च्या अध्यक्षीय निवडणुकांपूर्वीचं असून ट्रम्प यांच्यावरील आरोपांचा सविस्तर तपशील अद्याप जाहीर झालेला नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांचं अमेरिकेतील पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनिएल्ससोबत कथितरित्या अफेअर होतं. पण निवडणुकीच्या काळात तिचं तोंड बंद ठेवण्यासाठी तिला 1 लाख 30 हजार डॉलर्स इतकी भलीमोठी रक्कम देण्यात आली, असा ट्रम्प यांच्यावर आरोप आहे.
यासंदर्भात केलेल्या तपासानंतर अमेरिकेतील ज्युरींनी ट्रम्प यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या बाजूने मतदान केलं.दुसरीकडे, 76 वर्षीय ट्रम्प यांनी कोणतंही चुकीचं कृत्य केल्याचे नाकारत सर्व आरोप सुरुवातीपासून फेटाळून लावले आहेत. मात्र, या निमित्ताने अशा प्रकारे गुन्हा दाखल झालेले ट्रम्प हे पहिले राष्ट्राध्यक्ष (विद्यमान अथवा माजी) ठरले आहेत.
मॅनहॅटनचे डिस्ट्रिक्ट अॅटर्नी अॅल्विन ब्रॅग यांच्याकडून या प्रकरणात तपास करण्यात येत आहे. त्यांनी हा गुन्हा दाखल झाल्याच्या माहितीला दुजोरा दिला.
ब्रॅग यांच्या कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार, यासंदर्भात त्यांनी ट्रम्प यांच्या वकिलांशी संपर्क साधला. सदर प्रकरणात ट्रम्प यांनी आत्मसमर्पण करावं, यासाठी समन्वय साधला जात आहे. सध्या तरी याची प्रक्रिया सुरू आहे, असं त्यांनी म्हटलं.