मात्र जाळीच्या शेडमध्ये अडकून झाला जेरबंद
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील वाबळेवाडी येथे एका शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्ममध्ये बिबट्याची मादी शिरली. तीन-चार कोंबड्यांचा तिने फडशा पाडला. मात्र तीही जाळीच्या शेडमध्ये जेरबंद झाली. वन विभागाच्या पथकाने डॉट मारून या बिबट्याच्या मादीस बेशुद्ध केले. तिला पिंजऱ्यात जेरबंद करून दोन किलोमीटरवरील जंगलात नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
वाबळेवाडी येथे सोमवारी पहाटे वीजपुरवठा खंडित झाला होता. अंधारात शेतकरी नामदेव सुखदेव वाबळे, रा. वाबळेवाडी यांच्या पोल्ट्री फार्मची जाळी उचकटून एक चार वर्षांची बिबट्याची मादी आत शिरली. बिबट्याने चार कोंबड्या फस्त केल्या. परंतु अंधारात बाहेर पडण्याचा मार्ग सापडेना. त्यामुळे बिबट्या पोल्ट्री फार्ममध्ये रस्ता शोधायला फिरू लागला. बिबट्याला पाहिल्यावर कोंबड्या ओरडू लागल्या. त्यामुळे शेतकरी वाबळे यांना बिबट्या अडकल्याचे लक्षात आले.
घटनेची माहिती समजताच वनक्षेत्रपाल युवराज पाचारणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल लक्ष्मीकांत शेंडगे, वनरक्षक समाधान चव्हाण, शंकर खेमनर, मदन गाडेकर, राजेंद्र घुगे, वन कर्मचारी सुभाष घनदाट, बाळासाहेब झावरे, मुसाखान पठाण, बाळासाहेब दिवे यांनी पिंजऱ्यासह घटनास्थळी धाव घेतली. बिबट्या चिडलेला होता. त्यामुळे बेशुद्ध केल्या शिवाय त्याला जेरबंद करणे शक्य नव्हते.
संगमनेर येथील वनरक्षक संतोष पारधी, वन कर्मचारी रवींद्र पडवळे यांना बोलविण्यात आले. त्यांनी डॉट मारून बिबट्याला बेशुद्ध केले. सकाळी साडेअकरा वाजता बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आला. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी बिबट्याची जागेवर तपासणी केली. मादी बिबट्या असल्याने वन खात्याने घटनास्थळापासून दोन किलोमीटर अंतरावरील वन खात्याच्या वाबळेवाडीच्या जंगलात नैसर्गिक अधिवासात बिबट्याला मुक्त केले.