कोपरगाव ( प्रतिनिधी ) : हिंदू संस्कृतीमध्ये बैलपोळा सणाला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. शेतकऱ्यांचा मित्र म्हणून बैलजोडीकडे पाहिले जाते. मात्र आता बैलांचे प्रमाण कमी झाले असून शेतकरी यांत्रिकीकरणाकडे वळाले आहे. अजूनही खेड्यापाड्यात शेतीची मशागतीसाठी बैलांनाच महत्त्व दिले जाते. घरोघरी पोळा सण साजरा केला जातो मात्र सर्वांच्याच घरी बैलजोडी नसल्याने मातीच्या वाढ बैलांची पूजा करण्याची परंपरा ग्रामीण भागासह शहरात अजून जोपासली जाते. तब्बल पन्नास वर्षापासून पोहेगाव येथील संपत सुखदेव जोर्वेकर हे पंचक्रोशीत माती पासून बनवलेले वाढबैल विक्री करतात. सोनेवाडी येथे बैलपोळ्याच्या निमित्ताने मातीचे बैल विक्रीसाठी आले असताना त्यांचे मनराज जावळे व भिवराज जावळे यांनी स्वागत केले.
यावेळी संपत जोर्वेकर यांनी माहिती देताना सांगितले की तीन महिने अगोदरच बैलपोळा सणासाठी मातीचे बैल तयार करण्याचे काम करावे लागते. हे संपूर्ण बैल प्रदूषण विरहित असतात. आत्ताची पिढी या कामापासून दूर चालली आहे. तीन महिने कष्ट करून बनवलेले बैल बैलपोळा सणाच्या अगोदर दहा ते पंधरा दिवस विक्री करावी लागते. पाच बैलापासून साधारण वीस रुपये शेतकऱ्याकडून घेतले जातात.
गेल्या ५० वर्षाची परंपरा असल्याने हे काम सोडावे वाटत नाही. कष्ट जास्त असतात मात्र यापासून नफा अत्यंत किरकोळ मिळतो. हिंदू धर्मातले सर्व सण आणि त्यासाठी लागणारे साहित्य बनवण्याचे काम वर्षानुवर्ष सुरू आहे. माठ,घट, चुली,केळी,करा,तवळी, गणपती अदी वस्तू तयार करावे लागतात. मुलांचे शिक्षण झाले असून ते बाहेर स्थायिक झाले आहे. मी व पत्नी हे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी सनावाराला जास्त महत्त्व असायचे मात्र आता डिजिटल जमान्यात या गोष्टी लोपपावत चालल्या असल्याचे मनराज जावळे यांनी सांगितले.