कोपरगाव( वार्ताहर) : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी पोहेगाव या तीन किलोमीटर रस्त्यावर वन विभागाने सात वर्षांपूर्वी वृक्षारोपण अंतर्गत रस्त्याच्या दोन्ही बाजूने हजारो झाडांची लागवड केली आहे. आता ही झाडे वाढली असून रस्त्याच्या एका बाजूने विद्युत वितरण कंपनीचे पोल उभे असून विद्युत वाहणाऱ्या तारा या झाडांना स्पर्श करत असल्याने विद्युत वितरण कंपनीची वक्रदृष्टी या झाडावर पडली आणि त्यांनी या झाडांची कत्तल करण्यास सुरुवात केली. वृक्ष प्रेमी मध्ये मात्र याबाबत तीव्र संतापाची लाट आहे.लाखो रुपये खर्च करून वन विभागाने या रस्त्याच्या बाजूला लिंब व इतर जंगली झाडे लावलेली आहेत. तीन वर्षे या झाडांचे संगोपन वन विभागाने केले. त्या झाडाच्या संगोपणासाठी मजुरांसह पाणी व इतर खर्च लाखोंच्या वरती झाला आहे.या परिसरात झाडे वाढली रस्त्याच्या दोन्ही बाजूने सौंदर्य फुलले मात्र झाडे वाढतात विद्युत वितरण कंपनीने मात्र ही झाडे कत्तल करण्यासाठी मोहीमच उभारली.प्रत्येक वर्षी विद्युत वितरण कंपनीच्या तारांना झाडे खेटून विद्युत पुरवठा खंडित होतो असे कारण दाखवत झाडाची छाटणी करण्यात ते धन्यता मानतात.सुरुवातीला तर ही झाडे बुडापासूनच डोडण्याचे षड्यंत्र रचण्यात आले होते मात्र वृक्षप्रेमी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या उठावानंतर ते थांबले आहे.दरवर्षी झाडांची छाटणी केल्यामुळे झाडांची वाढ खुंटत असून वन विभागाने केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया जातो आहे याचे गांभीर्य व भीती दोनही विभागाला राहिली नाही . सालाबाद प्रमाणे दरवर्षी उन्हाळ्यात या झाडांची छाटणी विद्युत वितरण कंपनीकडून करण्यात येते मात्र याची साधी चौकशी देखील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी करू नये ही दुर्दैवी बाब आहे.रस्त्याच्या दोन्ही तर्फा वाढलेली ही झाडे जिवंत ठेवायची असेल तर विद्युत वितरण कंपनीने आपल्या विद्युत वाहून नेणाऱ्या पोल व तारांची इतरत्र दुसऱ्या जागेत व्यवस्था करावी अशी मागणी वृक्षप्रेमीकडून करण्यात येत आहे.