पोहेगाव .. कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील नवसाला पावणारा गणपती म्हणून श्री मयुरेश्वर गणपतीची ओळख आहे. मंगळवार दिनांक २५ रोजी अंगारकी संकष्ट चतुर्थी निमित्ताने हजारो भाविकांनी मयुरेश्वर गणपतीचे दर्शन घेतले. श्री गणेश ट्रस्टच्या विश्वस्तांनी अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्ताने भाविकांना दर्शनासाठी कुठल्याही प्रकारची अडचणी येऊ नये म्हणून व्यवस्थित नियोजन केले होते.
श्री गणेश ट्रस्ट व मयुरेश्वर मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी गणपती मंदिर परिसरात आलेल्या व्यवसायिकांना जागा उपलब्ध करून दिली , भाविकांच्या वाहतुक व्यवस्थेवर हे मंडळ लक्ष ठेवून होते.दोन दिवसापासूनच श्री गणेश ट्रस्ट च्या वतीने या चतुर्थीचे नियोजन करण्यात आले होते. मंदिराच्या अवतीभवती विद्युत रोषणाई, भाविकांना दर्शन घेण्यासाठी मंडपाची व्यवस्था करण्यात आली होती.ट्रस्टच्या वतीने आलेल्या सर्व भाविकांना मोफत फराळ खिचडीचे वाटप तसेच चहाची व्यवस्थाही करण्यात आली होती. कोपरगाव, येवला, शिर्डी लासलगाव ,सिन्नर, नाशिक, तसेच पोहेगाव पंचक्रोशीतील हजारो महिला व पुरुष भाविकांनी मयुरेश्वर गणपतीचे दर्शन घेतले. मंगळवारी पहाटे चार वाजेपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत दर्शनाची व्यवस्था श्री गणेश ट्रस्ट व मयुरेश्वर मित्र मंडळाच्या वतीने चालू ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले .पायी येणा-या भाविकांची संख्या मोठी होती.यावेळी संजीवनी आयुर्वेदिक रुग्णालयामार्फत सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.तसेच संजीवनी ब्लड बँक कोपरगाव व समता ब्लड बँक नाशिक यांच्यामार्फत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यात ८० जणांनी रक्तदान केले.