कोपरगाव ( वार्ताहर) सूर्य आग ओकतो की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली असून येत्या दोन दिवसात तर उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असून कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव चांदेकसारे परिसरात अंगाची लाही लाही होत आहे. उन्हाच्या तीव्रतेने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
सकाळी नऊ पासूनच सूर्य आग ओतायला सुरुवात करतोय संध्याकाळी पाच पर्यंत हीच परिस्थिती कायम राहते त्यामुळे नागरिकांना उन्हात फिरणे धोक्याचे झाले आहे. 40° पेक्षा जास्त उन्हाची तीव्रता या परिसरात असून अजूनही ही परिस्थिती वाढण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते. यामुळे माणसाच्या आरोग्यावर मोठा परिणाम होताना दिसत आहे.
आईने उन्हाळ्यात लग्नाचा दिवस असल्याने पै पाहुण्यांच्या लग्नासाठी जावे लागते मात्र उन्हाळा भयंकर असल्याने मोठा त्रास नागरिकांना जाणवतो. तर शेतीतील कामे करण्यासाठी मजूर व शेतकऱ्यांना या उन्हाच्या त्रासापासून सुटका नसते. मात्र समोर असलेले शेती पिकाचे काम त्यांना करावेच लागते. त्यामुळे अनेकांना आरोग्याचा त्रास होताना दिसत आहे. उन्हाळ्यापासून बचाव करण्यासाठी पोहेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन बडदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की उन्हाळ्याची तीव्रता भयंकर असून नागरिकांना उन्हापासून बचाव करायचा असेल तर शक्यतो घराच्या बाहेर सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत पडणे टाळले पाहिजे. वयोवृद्ध नागरिकांसाठी तर हे महत्त्वाचे आहे. डीहायड्रेशन बीपी व थकवा टाळण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यायला हवे. एखाद्या कार्यक्रमाला जायचे असेल तर उन्हापासून बचाव करणाऱ्या वस्तू वापरल्या पाहिजे. अशीच परिस्थिती साधारण मे एंडिंग पर्यंत राहू शकते. तेव्हा नागरिकांनी काळजी घ्यावी अशे आवाहनही डॉ नितीन बडदे यांनी केले.