देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करायाचा आहे.परंतु राजकीय मान्यवरांच्या हस्ते करण्याऐवजी गावातील महिलांच्या हस्ते करण्याचा निर्णय घेतला.ग्रामपंचायतची माहे २०२३ अखेरची घरपट्टी व पाणी पट्टी जमा करणाऱ्या कुटुंबातील महिलांच्या नावे सोडत पद्धतीने काढुन त्याच महिलेच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी झेंडावंदन करण्यात येवून त्या महिलेचा साडी चोळी देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचे सरपंच सर्जेराव घाडगे यांनी सांगितले.
कणगर ग्रामपंचायत येथिल गावात ग्रामपंचायतीच्या वातीने प्रजासत्ताक दिन साजरा करायचा पण कोणाच्या हस्ते करायचा यावर चर्चा करत असताना ग्रामपंचायतचे सरपंच सर्जेराव घाडगे यांनी सदस्या समोर विषय मांडला त्यामध्ये ग्रामपंचायतीची माहे २०२३ अखेर पर्यंतची घरपट्टी व पाणीपट्टी ज्या कुटुंबानी भरली आहे. अशा कुटुंबाची यादी तयार करुन त्यांच्या घरातील महिलांचे नावे एकञित करुन या सर्व महिलांचे नावे सोडत पद्धतीने काढण्यात येवून ज्या महिलेच्या नावाची चिठ्ठी निघेल त्यांच्या हस्ते २६ जानेवारी २०२३ रोजी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्याचा निर्णय मासिक सभेत घेण्यात आला.
त्यानुसार घरपट्टी व पाणीपट्टी अदा करण्यांत आलेल्या कुटुंबाची यादी तयार करुन त्या कुटुंबातील महिलांच्या नावाची यादी तयार करण्यात आली.सर्व महिलांची नावे एकञित करुन कुटुंब प्रमुखांच्या नावाने सोडत काढण्यात आली. या सोडतीत भगवान विठ्ठल नालकर यांची चिठ्ठी निघाल्याने त्यांची पत्नी सरस्वती नालकर यांच्या हस्ते २६ जानेवारी रोजी ध्वजारोहण होणार असून त्यानंतर साडी चोळी देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे सरपंच घाडगे यांनी सांगितले.