ज्यांचा काडीचा संबंध नाही त्यांचे फुकटचे श्रेय घेण्यासाठी धडपड – अनिरुद्ध काळे
कोळपेवाडी वार्ताहर -: कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक दोनच्या विकासासाठी आ.आशुतोष काळे Ashutosh Kale यांनी निधी दिला आहे मात्र या विकास कामात ज्यांचे काडीचे योगदान नाही ते मात्र श्रेय घेण्यासाठी केविलवाणी धडपड करीत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अनिरुद्ध काळे Anirudh Kale यांनी माजी नगरसेवक यांच्यावर केली आहे.
आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराच्या विकासाचा चेहरा मोहरा बदलताना शहरातील प्रत्येक प्रभागाला न्याय देऊन कोट्यवधी रुपयांचा निधी शहर विकासाला दिला आहे यामध्ये प्रभाग क्रमांक दोनचा देखील समावेश आहे. प्रभाग क्रमांक दोन मधील विकासाचे प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी निवारा हाउसिंग सोसायटी, सुभद्रा नगर, कोजागिरी कॉलनी, जानकी विश्व, रिद्धी-सिद्धी नगर, आढाव वस्ती येवला रोड, ओम नगर या भागातील नागरिकांसाठी जिल्हा नियोजन विकास आराखड्यामधून १ कोटी १० लाखाचा निधी त्यांनी दिला आहे.
या प्रभागातील नागरिकांनी आ.आशुतोष काळे यांच्याकडे प्रभागातील रस्ते,गटारी तसेच विविध विकास कामे व्हावी याबाबत मागणी केली होती.नागरिकांनाहोत असलेल्या त्रासाची दखल घेवून आ.आशुतोष काळे यांनी दिलेल्या सूचनेनुसार प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांना अपेक्षित असलेला रस्ते व गटारी यांचा आराखडा तयार करण्यासाठी आपण स्वतः मोजणी केली आहे.त्यामुळे प्रभागातील विकास कुणामुळे होत आहे याची नागरिकांना माहिती आहे.परंतु ज्यांना प्रभागातील जनतेने मोठ्या विश्वासाने निवडून दिले त्यांना त्यांच्या कार्यकाळात प्रभागाचा विकास करण्याचे सुचले नाही मात्र आता पद गेल्यानंतर विकासाला निधी दिला असल्याचे प्रभागातील माजी नगरसेवक सांगत आहे ही प्रभागातील नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक असून त्यांनी नागरिकांना वेड्यात काढू नये अशी टीका अनिरुद्ध काळे यांनी माजी नगरसेवक यांच्यावर केली आहे.